बिकट अवस्था! कुठे धोकादायक इमारती तर कुठे उघड्यावर भरते शाळा
By गणेश हुड | Published: December 6, 2022 02:55 PM2022-12-06T14:55:42+5:302022-12-06T14:59:33+5:30
नागपूर जिल्ह्यातील ८८ शाळांच्या इमारती जीर्ण, धोकादायक; बांधकाम व दुरुस्तीसाठी ११.७३ कोटींची मागणी
नागपूर : शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राजर्षी शाहू महाराज यांनी २४ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी केली होती. आजही मोफत व सक्तीचे शिक्षणाचा कायदा आहे. परंतु बांधकामासाठी निधी नसल्याने ग्रामीण भागातील शाळांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील ८८ शाळांतील इमारती जीर्ण व धोकादायक झाल्याने कुठे धोकादायक इमारतीत तर कुठे उघड्यावर झाडाखाली शाळा भरत आहे.
शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८८ शाळांतील वर्गखोल्या धोकादायक आहेत. काही वर्ग खोल्यांना तडे गेले आहेत. तसेच पावसाळ्याच्या. दिवसात या इमारतीच्या छतातून, भिंतीमधून इमारतीच्या आत पाणी झिरपते तर कुठे छत गळते. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी निर्माण होतात. अशा धोकादायक खोल्यात वर्ग भरत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. जीर्ण खोल्यांना पाडून नवीन वर्गखोल्यांचे तातडीने बांधकाम करण्याची गरज आहे. दुर्दैवाने याचाही निधी रोखला आहे. शाळा इमारती बांधकाम प्रस्ताव एक-दोन वर्षापूर्वीचे आहे.
११.७३ कोटींचा निधी मंजूर
जिल्हा परिषदेच्या ८८ शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण व धोकादायक आहेत. बांधकामासाठी ११ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर आहे. परंतु शासनाने निधी रोखल्याने बांधकाम थांबले आहे. काही गावांत अशा धोकादायक इमारतीत शाळा भरते. यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोंडीखापा गावात झाडाखाली भरते शाळा
काटोल तालुक्यातील माळेगाव गट ग्रामपंचायत मधील गोंडीखापा गावातील प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाल्याने चार पैकी एकच एकच खोली उरली आहे. बांधकामाचा प्रस्ताव मंजूर आहे. यासाठी १३ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. मात्र शासनाने निधी थांबविल्याने विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून शाळेच्या आवारातील झाडाच्या कुशी बसून शिक्षण घेत आहे. गोंडीखापा गावात असलेली प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने या शाळेच्या इमारतीत असलेल्या चारपैकी तीन वर्गखोल्या २०१९मध्ये जमीनदोस्त करण्यात आल्या कोरोना काळ गेला आणि लागलीच प्रस्ताव शासनाकडे पाठविला. फक्त एक वर्गखोली बांधण्याला मंजुरी मिळाली. परंतु हा निधी रोखला आहे.
तालुकानिहाय स्थिती
*तालुका - धोकादायक वर्गखोल्या - मंजूर निधी (लाखांत)*
- नागपूर - ७ - ९२.०५
- मौदा - ६ - ८०.००
- काटोल - ८ - १०८.००
- नरखेड - ७ - ९२.००
- कळमेश्वर - ६ - ८०.००
- कामठी - ६ - ८०.००
- उमरेड - ५ - ६६.०५
- रामटेक - ६ - ८१.००
- सावनेर - ७ - ९४.०५
- कुही - ८ - १०६.००
- भिवापूर - ७ ० ९५.०५
- हिंगणा - ९ - ११९.००
एकूण - ८८ - ११७३.००