Buldhana Bus Accident : चक्क प्रवाशांना ट्रॅव्हल्सचे नाव, यादी पूर्ण अपडेट नाहीच!
By योगेश पांडे | Published: July 1, 2023 10:02 AM2023-07-01T10:02:44+5:302023-07-01T10:05:00+5:30
ट्रॅव्हल्सने बुकिंग घेत असताना काही प्रवाशांची पूर्ण नावेदेखील घेतली नव्हती. त्यामुळेच संपर्क करताना अडचणी येत आहेत.
नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसची समृद्धी महामार्गावर राखरांगोळी झाली असून मृतक व वाचलेल्या प्रवाशांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांच्या यादीनुसार बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते व त्यात १० महिलांचा समावेश होता. यात तरुणींसह ज्येष्ठ नागरिक महिलादेखील होत्या. ट्रॅव्हल्सने बुकिंग घेत असताना काही प्रवाशांची पूर्ण नावेदेखील घेतली नव्हती. त्यामुळेच संपर्क करताना अडचणी येत आहेत.
लोकमतला मिळालेल्या ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांच्या यादीनुसार १० महिलांपैकी बहुतांश तरुणी होत्या. तेजस, करण, वृषाली, इशांत, शृजन, तनिषा, तेजू, कैलास, संजीवनी, सुशिल, गुडिया, कौस्तुभ, राजश्री, राधिका, प्रथमेश, अवंती, निखील, पंकज, शशिकांत, आयुष अशी प्रवाशांची नावे दाखविल्या जात आहेत. बहुतांश प्रवाशांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या हलगर्जीपणाचा नमुना या यादीतून समोर आला आहे. सीट क्रमांक १९ व २० चे बुकिंग कुठल्याही प्रवाशाच्या नावे नव्हे तर स्टारलिंक ट्रॅव्हल्सच्या नावे दाखविण्यात आले आहे.
संबंधित क्रमांकावर फोन केला असता तो आणखी तिसऱ्याच ट्रॅव्हल्सचा निघाला. तेथील व्यक्तीने दिलेली माहिती आणखी धक्का देणारी होती. या सीट्सवर एक महिला व पुरुष प्रवास करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या जागांवर नागपुरातील बुटीबोरी येथून दोन तरुण बसले होते. ते तरुण औरंगाबादपर्यंत जाणार होते. त्यांची नावे किंवा कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती.