नागपुरातील केळीबाग रोडवर चालला बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:41 PM2018-08-01T23:41:35+5:302018-08-01T23:44:13+5:30
केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ते कोतवाली ठाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. बाजार विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने ही दुकाने तोडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली दुकाने हटविण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या अधीन असलेल्या महालातील या २३ दुकानांपैकी १६ दुकाने बुधवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली. कारवाईदरम्यान बडकस चौक ते कोतवाली ठाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. बाजार विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने ही दुकाने तोडली.
आठवडाभरापूर्वी बाजार विभाग व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अधिकारी दुकाने पाडण्यासाठी गेले होते. त्यावेळी व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवत तीव्र विरोध केला होता. विरोध पाहता पथक कारवाई न करताच परतले होते. यानंतर महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी व्यापाऱ्यांना १ आॅगस्टपर्यंत दुकाने रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. संबंधित दुकानदारांना यापूर्वीच दुकाने खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत दुकाने तोडण्याचे काम सुरू होते. कारवाईदरम्यान मेघा मॅचिंग सेंटर, मयताच्या सामानाचे दुकान, फाईन कलेक्शन, नंदकिशोर पुस्तक भंडार, अजंता साडी, संगीता साडी, अमित ड्रेसेस, नरसापूरकर रेडिमेड, मनपसंद कलेक्शन, लवली ड्रेसेस, पूजा साडी सेंटर, सत्यम ड्रेसेस, अनूप ड्रेसेस, सुनील कलेक्शनची इमारत तोडण्यात आली. बाजार विभागाचे सहायक आयुक्त विजय हुमणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, मदन सुभेदार आदी या वेळी उपस्थित होते.
रस्ता होणार ८० फूट रुंद
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केळीबाग रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित रस्ता आता ८० फुटाचा होणार आहे. त्यामुळेच दुतर्फा असलेली दुकाने तोडली जात आहेत. यात अडथळा निर्माण करणाऱ्या महापालिकेच्या मालमत्ता आधी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्रमात गांधीबाग झोन कार्यालयाची इमारत, कर्मचारी पतसंस्था कार्यालयाची भिंत, पार्किंग कॉम्प्लेक्ससमोरील भिंत महापालिकेने पाडली होती.
व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी
केळीबाग रस्ता रुंदीकरणात दुकाने तोडण्यात येत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. काही लोकांना फायदा पोहचविण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. महाल बाजार ही नागपूरची ओळख होती. ती ओळख दुकानांसोबत जमीनदोस्त करण्यात आली आहे. सुमारे सव्वा किलोमीटर लांब या रस्त्यावरील बांधकामे हटविण्यासाठी महापालिकेला बरीच कसरत करावी लागणार आहे. जर मोबदला दिला गेला तर ही रक्कम १०० कोटींच्या आसपास जाईल.
सीताबर्डी, गोकुळपेठेत कारवाईदरम्यान तणाव
धरमपेठ झोनतर्फे बुधवारी गोकुळपेठ मार्केट व सीताबर्डी येथील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान दुकानदार व विक्रेत्यांनी तीव्र विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारातील अतिक्रमण हटविण्यास सकाळी सुरुवात झाली. येथील फूटपाथवरील ४० अतिक्रमण हटविण्यात आले. १९ दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. या कारवाईमुळे गोकुळपेठ मार्केटमध्ये धावपळ माजली. कारवाई पाहून दुकानदारांनी स्वत:च आपले शेड व फूटपाथवर ठेवलेले सामान हटविले. यानंतर पथकाने सीताबर्डी मोदी नंबर तीनमध्ये कारवाई केली. येथे दुकानासमोर पक्के अतिक्रमण करण्यात आले होते. जेसीबीच्या मदतीने ते तोडण्यात आले. दुकानदारांचे ओटे, जाहिरात फलक, अन्य बांधकाम तोडण्यात आले. रस्त्यावर दुकान थाटणाऱ्यांचे सामानही जप्त करण्यात आले. सुमारे तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.