नायलॉन मांजावर चालला बुलडोझर, दोन हजार चक्री नष्ट; नागपूर पोलिसांची कारवाई
By योगेश पांडे | Updated: January 13, 2025 22:04 IST2025-01-13T22:04:05+5:302025-01-13T22:04:23+5:30
नागपूर पोलिसांची कारवाई : संक्रांतीच्या दिवशी पोलिसांचा राहणार पतंगबाजांवर वॉच

नायलॉन मांजावर चालला बुलडोझर, दोन हजार चक्री नष्ट; नागपूर पोलिसांची कारवाई
योगेश पांडे
नागपूर : मकरसंक्रांतीच्या पुर्वसंध्येला नागपुरात पोलिसांनी तब्बल १८ लाख रुपये किंमतीचा नॉयलान मांजा रोडरोलरखाली नष्ट केला. ही कारवाई इंदोरा मैदानात नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या पुढाकारातून ही कारवाई करण्यात आली. यात आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध गुन्ह्यांत नॉयलान मांजा जप्त करण्यात आलेल्या दोन हजारांहून अधिक चक्रींचा समावेश होता.
मनपा प्रशासनाच्या सुस्त भूमिकेमुळे शहरात काही महिन्यांअगोदरच नायलॉन मांजाचा साठा पोहोचला.
दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होतात व काहींचा जीवदेखील गेला आहे. यावर्षी पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यापासूनच कारवाईला सुरुवात केली होती. संपूर्ण नागपुरात पोलिसांनी यंदा १८३ आरोपींना पकडून १३१ गुन्हे दाखल केले असून ७५ लाखांहून अधिकचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. कोराडी, जरीपटका, कपीलनगर, यशोधरानगर, पारडी, कळमना आणि नवी कामठी, जुनी कामठी या आठ पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस निरीक्षक आणि अंमलदारांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात सतत कारवाई केली. उपायुक्त कदम स्वत: मोबाईल सर्व्हिलेन्स वाहनाव्दारे पतंग उडविणारे आणि विक्रेत्यांवर लक्ष ठेवून होते. आठही पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्लॅस्टिक पतंग आणि नॉयलान मांजा जप्त करण्यात आला. इंदोरा मैदान येथे दोन हजार चक्रीसह १८ लाखांचा मांजा ठेवण्यात आला. उपायुक्त निकेतन कदम यांच्या उपस्थितीत त्यावर रोडरोलर फिरवून संपूर्ण चक्री नष्ट करण्यात आल्या. नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल डंपिंग यार्ड येथे पाठविण्यात आला. यावेळी आठही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार उपस्थित होते. याप्रसंगी मांजा नष्ट करण्याची प्रक्रिया बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
नायलॉन मांजाचा वापर केला तर गुन्हा
कुणीही प्रतिबंधित नॉयलान मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर करु नये. विक्रेत्यांवर कठोर कारवाई पोलीस करीत आहेत. ड्रोनद्वारे आम्ही मैदानावरुन पतंग उडविणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहोत. कुणाकडे नॉयलान मांजा दिसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस विभागाकडून देण्यात आला आहे.