ताजबागमधील गुंड आबूच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:05 PM2023-07-31T12:05:34+5:302023-07-31T12:07:57+5:30
पोलिसांच्या बंदोबस्तात मनपाने ५ अवैध बांधकाम तोडले
नागपूर : ताजबागमध्ये गुंड आबू ऊर्फ फिरोज खान, त्याच्या भाऊ व अन्य नातेवाइकांच्या अवैध बांधकामावर महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने कारवाई केली. हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या जागेवर त्यांनी अवैध पद्धतीने व्यावसायिक इमारतींचे बांधकाम केले होते. यापूर्वी मनपाद्वारे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु अतिक्रमणधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
रविवारी सकाळी ९ वाजता पोलिसांच्या बंदोबस्तात मनपाचे अतिक्रमण पथक ताजबाग येथे पोहचले. हे बांधकाम हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या जागेवर करण्यात आले होते. अतिक्रमण करणाऱ्या फारुख भाई गफुर शेख, आबू अजीज खान, वसीम खान व अमजद अजीज खान यांना महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ अन्वये जानेवारी २०२२ मध्ये नेहरूनगर झोनने नोटीस बजावली होती. परंतु नोटिशीला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. उलट अतिक्रमणधारी व्यावसायिक इमारतीचे बांधकाम तिथे करीत होते. त्यामुळे महापालिकेद्वारे ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. मनपाच्या पथकाने ५ दुकानांना जमीनदोस्त केले. ही कारवाई सहा. आयुक्त हरीश राऊत, घनश्याम पांढरे, प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकार्डे, भास्कर माळवे, पलाश पाटील यांच्याद्वारे करण्यात आली.