रिव्हॉल्वरमधील गोळी मांडीतून गेली आरपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:57+5:302021-07-18T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सर्व्हिस रिव्हॉल्वरची लॉक झालेली मॅक्झिन फिट करताना ट्रिगर दबला. रिव्हॉल्वरची गोळी नायक पोलीस शिपायाच्या ...

The bullet in the revolver went through the thigh | रिव्हॉल्वरमधील गोळी मांडीतून गेली आरपार

रिव्हॉल्वरमधील गोळी मांडीतून गेली आरपार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सर्व्हिस रिव्हॉल्वरची लॉक झालेली मॅक्झिन फिट करताना ट्रिगर दबला. रिव्हॉल्वरची गोळी नायक पोलीस शिपायाच्या मांडीतून आरपार बाहेर निघाल्याने तो गंभीर जखमी झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याजवळ शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. शेषकुमार देवीदास इंगळे (३५) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायी व्यंकट गंथाळे (चार्ली) याची शुक्रवारी नाईट ड्युटी होती. ती संपल्यानंतर त्याने त्याच्या जवळची सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा करण्यापूर्वी साफ केली. मॅक्झिन बाहेर काढली. ती साफ केल्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही मॅक्झिन लागत नव्हती. नाईट ड्युटीवरच असलेले नायक शिपायी इंगळे यांना गंथाळेने फोन केला. इंगळे तेव्हा बाजूच्या चहाच्या टपरीवरच होते. त्यांनी गंथाळेला तेथे बोलवून घेतले. रिव्हॉल्वर हातात घेऊन तिचे लॉक उघडले अन् मॅक्झिन फिट करत असताना अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली. ती इंगळेच्या मांडीतून आरपार बाहेर पडली. इंगळे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बाजूलाच पोलीस ठाणे असल्याने ठाण्यातील मंडळी धावली. त्यांनी इंगळेंना तातडीने खासगी इस्पितळात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाणेदार विजय आकोत यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर गंथाळेचा जबाब नोंदवून घेण्यात आला. माहिती कळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही रुग्णालयात जाऊन इंगळेची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रकृतीची माहितीही जाणून घेतली.

बेफिकिरी नडली

इंगळे अडीच वर्षांपासून बेलतरोडी ठाण्यात कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते अनेक वर्षे गडचिरोली पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे शस्त्र हाताळणीचे त्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे. असे असूनही मॅग्झिन लावताना काहीशी बेफिकिरी झाली. त्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने मांडीत गोळी शिरल्याने इंगळे बचावले. गोळी वरच्या भागात लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

---

Web Title: The bullet in the revolver went through the thigh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.