दुसऱ्या महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून झाडली गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 08:44 PM2018-09-12T20:44:32+5:302018-09-12T20:48:32+5:30
पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडणाऱ्या आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. यातूनच पत्नीवर गोळी झाडण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीस आली आहे. मीनाबाई रवींद्र नागपुरे (४०) रा. दत्तात्रयनगर सक्करदरा असे मृत पत्नीचे तर रवींद्र हरिराम नागपुरे, असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान आरोपी पतीचाही मृत्यू झाला. या घटनेने विवाहबाह्य अवैध संबंधामुळे सुखी कुटुंब कसे बर्बाद होते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडणाऱ्या आरोपी पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. यातूनच पत्नीवर गोळी झाडण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीस आली आहे. मीनाबाई रवींद्र नागपुरे (४०) रा. दत्तात्रयनगर सक्करदरा असे मृत पत्नीचे तर रवींद्र हरिराम नागपुरे, असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी उपचारादरम्यान आरोपी पतीचाही मृत्यू झाला. या घटनेने विवाहबाह्य अवैध संबंधामुळे सुखी कुटुंब कसे बर्बाद होते, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
ही घटना मंगळवारी रात्री १०.४५ वाजता सर्वेश्वर मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे नागपुरे दाम्पत्यांची दोन्ही मुलेही हादरली आहेत. पोलीस सूत्रानुसार, रवींद्र नागपुरे हुडकेश्वर परिसरात प्लायवूडचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी मीना व दोन मुलं आहेत. काही महिन्यांपूर्वी रवींद्रचे एका दुसºया महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून रवींद्र पत्नी व मुलांकडे दुर्लक्ष करू लागले. त्यामुळे पत्नी मीना आणि रवींद्र यांच्यात वाद होऊ लागले. रवींद्र दोन महिन्यांपासून दुसºया महिलेसोबत राहायला गेला होता. त्यामुळे दुखावलेली मीना मुलगा अनिकेतसोबत माहेरी निघून गेली होती.
मीना या तहसील कार्यालयात दस्तावेज बनवून देण्याचे काम करीत होती. रवींद्रकडून घरखर्च मिळत नसल्याने त्यांचे मोबाईलवरही वाद होत असत. अखेर मीना यांनी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मंगळवारी कौटुंबिक न्यायालयात नागपुरे दाम्पत्यांची तारीख होती. मुलाने वडिलांना फोन केला होता. तेव्हा आता न्यायालयातूनच खावटी घेण्याबाबत रवींद्र बोलला होता. परंतु मंगळवारी रवींद्र न्यायालयात आलाच नाही.
पत्नीच्या गळ्यावर झाडली गोळी
आरोपी रवींद्र मंगळवारी रात्री १०.३० वाजता कारने दत्तात्रयनगर येथील पत्नीच्या घरी पोहोचला. त्याचा पत्नी मीनासोबत काही वेळ जोरदार शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. घराबाहेर पळत सुटलेल्या मीना नागपुरे यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. घराबाहेर येताच त्या जमिनीवर कोसळल्या.
पळून जाण्याचा मार्ग नसल्याने स्वत:वर झाडली गोळी
घरातून गोळी चालल्याचा आवाज ऐकूण मुलगा धावत आला. वडील बहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुलाने बाहेरून दरवाजा बंद केला. पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने अखेर रवींद्रनेही संतापून स्वत:च्या छातीवर गोळी झाडली. तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. वडील आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मुलगा अनिकेतने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. यानंतर ठाणेदार सांदीपन पवार, पीएसआय डोळे आणि पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाले.
अगोदर पत्नी व नंतर पतीनेही सोडला जीव
दोघांना गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांनी जखमी दाम्पत्यास मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान रात्री १२.१५ वाजता मीनाचा मृत्यू झाला. तर रवींद्रला रात्री उशिरा २ वाजता मृत घोषित करण्यात आले. सक्करदरा पोलिसांनी अगोदर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. नंतर आरोपी रवींद्रच्या मृत्यूनंतर कलम ३०९ अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.