समृद्धी महामार्गाशी लागून ‘बुलेट ट्रेन’धावणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:16 PM2020-07-29T20:16:48+5:302020-07-29T20:18:55+5:30
बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलेट ट्रेन ही समृद्धी महामार्गाशी लागून धावणार नाही, त्याच्यासाठी सध्या रेल्वे ट्रॅकजवळच ट्रॅक तयार करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रबंध निदेशक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने बुलेट ट्रेनसाठी महामार्गाजवळ जमीन अधिग्रहित करण्यास सांगितले होते. मोपलवार यांनी पत्रकारांशी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट सांगितले की, मुंबई नागपूर बुलेट ट्रेनच्या डीपीआरनुसार ट्रॅक रेल्वे लाईनच्या जवळच तयार होईल. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, जालना ते अकोलापर्यंत ग्रीनफिल्ड ट्रॅक तयार होईल. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा विस्तार कोलकातापर्यंत करण्यात येईल.
मोपलवार यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कर्जाचा भार कमी केला आहे. आता महामंडळावर समृद्धी महामार्गासाठी २८ हजार कोटी ऐवजी २५ हजार कोटी रुपयाचा भार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पातील आपला हिस्सा वाढवल्याने हे शक्य झाले आहे. कोविड-१९ मुळे वित्तीय स्थिती बिघडल्यानंतरही सरकारने महामंडळाकडून निधी परत घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.