किल्ले कोलारजवळ थरार, प्रेमीयुगुलावर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 01:45 PM2023-05-24T13:45:38+5:302023-05-24T13:53:15+5:30
निर्जनस्थळी केले टार्गेट : दाेघे गंभीर जखमी, तिघे आराेपी फरार
खापरखेडा (नागपूर) : हाॅटेलमध्ये जेवण केल्यानंतर प्रेमीयुगुल खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील नांदा शिवारातील किल्ले काेलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. अज्ञात तिघांनी त्या दाेघांना पकडून त्यांच्यासाेबत बळजबरी करून गाेळीबार केला. यात दाेघेही गंभीर जखमी झाले. तिघांनी प्रेमीयुगुलाकडील राेख रक्कम व माेबाइल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना साेमवारी (दि.२२) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेत प्रवीण बोंडे (रा. नागपूर) याच्यासह त्याची बाबा फरीदनगर, नागपूर येथे राहणारी २४ वर्षीय मैत्रीण जखमी झाली. हे दाेघेही साेमवारी रात्री दहेगाव (रंगारी, ता. सावनेर) परिसरात फिरायला आले हाेते. त्यांनी दहेगाव येथील एका हाॅटेलमध्ये जेवण केले आणि नंतर माेटारसायकलने किल्ले काेलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. मात्र, दाेघेही महामार्गाने न जाता काेलार नदीवरील पूल ओलांडून स्मशानभूमीच्या दिशेने वळले.
काहीवेळात अनाेळखी तिघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी तरुणीसाेबत अश्लील वर्तन केले. तिने प्रतिकार करताच एकाने प्रवीणला धरून ठेवले. तिघांनी या दाेघांकडील राेख रक्कम व माेबाइल फाेन हिसकावून घेत माेटारसायकलने पळ काढला. त्याचवेळी तरुणीने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला धरून खेचले. त्यातच एकाने तीन गाेळ्या झाडल्या व बंदुकीच्या बटने तरुणीच्या डाेक्यावर वार केला. यातील एक गाेळी प्रवीणच्या पायात शिरली. दाेघांनी काेराडी पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात भादंवि ३९७, ३५४, २५४ (ए), ३५४ (बी), भारतीय शस्त्र कायदा सहकलम ३, २५ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण खापरखेडा पाेलिसांकडे वर्ग केो. दाेघांवर नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आराेपीदेखील जखमी
प्रतिकारादरम्यान तरुणीने दगड भिरकावल्याने तिघांपैकी एका आराेपीच्या डाेक्याला जखम झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पाेलिसांनी तरुणीला घेऊन मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेतले.
त्या तरुणनीने केला होता प्रतिकार
त्या तरुणीने तीन आरोपींपैकी एका आरोपीच्या डोक्यावर दगड मारला. दगड डोक्यावर लागल्याने तो सुद्धा जखमी झाला. शिवाय, या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही पोलिसांनी सुरू केली आहे. एक दिवसाआधी प्रेमीयुगुलाला लुटल्याची घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिस त्याही दिशेने तपास करीत आहेत.