तुली रिसोर्टला वन विभागाकडून ‘क्लीन चिट’
By admin | Published: June 21, 2015 03:02 AM2015-06-21T03:02:21+5:302015-06-21T03:02:21+5:30
वनकायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्यजित विक्रमसिंग मोहब्बतसिंह तुली यांना वन विभागाने (वन्यप्राणी विभाग) ‘क्लीन चिट ’ दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सर्वेक्षण : वनकायद्याचे पालन
नागपूर : वनकायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्यजित विक्रमसिंग मोहब्बतसिंह तुली यांना वन विभागाने (वन्यप्राणी विभाग) ‘क्लीन चिट ’ दिली आहे. वनसीमेवर कचरा जाळणे व सीमा उद्ध्वस्त करण्याचा आरोप करून वन विभागाने भारतीय वन्यजीव अधिनियमांतर्गत तुली यांच्याविरुद्ध यावर्षीच्या जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता.
देवलापार हद्दीत सावरा बीट (वन्यप्राणी) या राखीव वनाच्या सीमेलगत मौजा बांद्रा येथे ७.८३ हेक्टर जमिनीवर तुली यांचे तुली बिरबाग या नावाने रिसोर्ट आहे. रिसोर्टलगत संरक्षित वनक्षेत्र आहे. सीमा उद्ध्वस्त करणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि कचरा जाळण्याच्या आरोपाखाली भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम २७ (४), ३०, ३२ चा भंग झाल्याचे सांगून रेंज वन अधिकारी (वन्यप्राणी) डी.एन. तोंडे यांनी तुली यांच्याविरोधात १२ जानेवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी तुली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. त्यानुसार नागपूर वनविभाग, आरएफओ आणि देवलापार क्षेत्रीय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितरीत्या रिसोर्ट असलेल्या शेताचे सर्वेक्षण करून गावातील चार जणांसमोर १३ जून २०१५ रोजी पंचनामा केला होता. तुली यांच्या शेताच्या चारही बाजूचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्यात आली. तुली यांचे रिसोर्ट त्यांच्या सीमेच्या आत असून मोजणीत अतिक्रमण आढळून आले नाही, शिवाय कोणत्याही प्रकारच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या नाही तसेच पिशव्या व कचरा जंगलामध्ये जळालेला नसल्याचा अहवाल देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. शेख यांनी नागपूर विभागीय मुख्य वनसंरक्षकांना १३ जून रोजी दिला. याप्रकरणी वन्यजीव विंगने चौकशी केली होती.
प्रकरणाची शहानिशा करून पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालकांनी सत्यजित विक्रमसिंह मोहब्बतसिंग तुली यांच्याकडून १५ जून २०१५ रोजी १५ हजार रुपये उपद्रव्य शुल्क आकारून हे प्रकरण नस्ती बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. शुल्क आकारणीची प्रत देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आणि नागपूरचे उपसंचालक यांच्याकडे पाठविण्यात आली.
मोहब्बतसिंह तुली यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, रिसोर्टमध्ये २३ कॉटेज आहेत. संपूर्ण परिसरात दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. बांधकाम सीमेच्या आत असून आम्ही वन कायद्याचे कुठलेही उल्लंघन केलेले नाही. तोंडे यांनी आमच्यावर आकसपूर्ण कारवाई करून आमच्याविरुद्ध वन कायद्याखाली गुन्हा नोंदविल्याचा आरोप त्यांनी केला.
तुली म्हणाले, हे रिसोर्ट नागपुरात ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ या इव्हेंटमध्ये केलेल्या घोषणेनुसार सुरू केले. रिसोर्टमध्ये या परिसरातील ८० टक्के आदिवासींना रोजगार दिला आहे. (प्रतिनिधी)