सराफा व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले
By admin | Published: July 5, 2017 01:35 AM2017-07-05T01:35:49+5:302017-07-05T01:35:49+5:30
पाचपावलीतील एका सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लुटारूंनी त्यांना बॅटने बेदम मारहाण केली.
डोळ्यात तिखट फेकले १० लाखांचा ऐवज लंपास पाचपावलीत लुटमार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील एका सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दोन लुटारूंनी त्यांना बॅटने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळचे १८१ गॅ्रम सोन्याचे दागिने, दोन लाखांची रोकड आणि सहा किलो चांदीसह सुमारे १० लाखांचा ऐवज लंपास केला. अत्यंत वर्दळीच्या वैशालीनगर मैदानाजवळ मंगळवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बंडूजी कुंभारे (वय ५५) हे सराफा व्यावसायिक वैशालीनगरातील हनुमान सोसायटीत राहतात. घरापासून ३०० फूट अंतरावर त्यांचे आकाश ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घरून दुकानात जाण्यासाठी आपल्या अॅक्टीव्हाने निघाले. बाजूच्या मैदानातून अचानक दोन लुटारू त्यांच्या समोर आले. त्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. त्यांनी कुंभारे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. धोका लक्षात आल्यामुळे त्यांनी अॅक्टीव्हा सोडून खांद्याला अडकवलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग घट्ट पकडून आरडाओरड केली. ते पाहून लुटारूंनी त्यांना क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बेदम मारहाण केली. जबर दुखापत झाल्याने
हतबल होऊन खाली पडलेल्या कुंभारेजवळची सोन्याची दागिने असलेली बॅग आणि अॅक्टीव्हा घेऊन लुटारू पळून गेले. अॅक्टीव्हाच्या डिक्कीमध्ये दोन लाखांची रोकड, ६ किलो चांदीची भांडी आणि दागिने असलेली एक बॅग होती.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. कुंभारेंना लुटल्या जात असल्याचे पाहून मैदानातील मुलांनीही आरडाओरड केली. त्यामुळे बाजूची मंडळी धावली. त्यांनी कुंभारेच्या तोंडावर पाणी मारून त्यांच्या डोळ्यातील मिरची पावडर साफ केली. पाचपावली पोलिसांना कळवून कुंभारेंना बाजूच्या रुग्णालयात नेण्यात आले.
क्रिकेटर बनून केली रेकी
लुटारुंनी ही लुटमार करण्यासाठी दोन दिवस क्रिकेटर बनून कुंभारे यांची रेकी केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या मैदानात मुले नेहमी क्रिकेट खेळतात. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यासाठी लुटारूंनी मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांशी मैत्री केली. त्यानंतर हे लुटारु गेल्या दोन दिवसांपासून या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागले. हे करतानाच ते कुंभारेच्या जाण्यायेण्यावर लक्ष ठेवून होते. त्यांच्यासोबत किंवा मागेपुढे कुणीच नसतो, हे ध्यानात आल्यामुळे त्यांनी कुंभारेंना लुटण्याचा कट रचला. ठरवल्याप्रमाणे ते मंगळवारी घटनेच्या अर्ध्या तासापूर्वी मैदानात येऊन मुलांसोबत क्रिकेट खेळू लागले. त्यानंतर कुंभारे दुकानाकडे जाताना दिसताच बॅटिंग करणाऱ्या मुलाच्या हातातील बॅट हिसकावून ते कुंभारेच्या समोर आले आणि त्यांनी लुटमार केली.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
माहिती कळताच पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनीही कुंभारेंची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी लुटारूंचा शोध घेण्यासाठी या भागातील अनेकांकडे चौकशी केली. एवढेच नव्हे तर लुटारू पळालेल्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले. त्यातील एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत लुटारू कैद झाले. त्यांनी तोंडावर कापड बांधले असल्यामुळे त्यांचा चेहरा ओळखण्यास अडचण येत आहे.