ठगबाजांना दणका

By admin | Published: June 8, 2017 02:47 AM2017-06-08T02:47:14+5:302017-06-08T02:47:14+5:30

अफलातून शक्कल लढवीत ग्रामीण भागातील तब्बल ३८० बेरोजगारांना भारत सरकारच्या उपक्रमात सहभागी करण्यासाठी

Bumpers to the thugs | ठगबाजांना दणका

ठगबाजांना दणका

Next

३८० बेरोजगारांना १४ लाखांनी गंडविले
राहुल अवसरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अफलातून शक्कल लढवीत ग्रामीण भागातील तब्बल ३८० बेरोजगारांना भारत सरकारच्या उपक्रमात सहभागी करण्यासाठी १४ लाख रुपयांनी गंडा घालणाऱ्या दोन ठगबाजांना न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. या ठगबाजांनी दाखल केलेले जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले. शशिकपूर जोहरलाल मडावी (२९) रा. सालेकसा गोंदिया आणि श्रीकांत तारकेश पारधी (२३) रा. मालडोंगरी ब्रह्मपुरी, अशी या ठगबाजांची नावे आहेत.

प्रथम या ठगबाजांनी गोंदिया सालेकसा येथे अनुसूचित जाती-जमाती कला ग्रामीण विकास संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी भारत सरकारची एक काल्पनिक योजना तयार केली. या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी खासगी शिकवणी वर्ग गाठले.
त्यांनी तरुणांना असे सांगितले होते की, भारत सरकारच्या ग्रामीण कला विकास संस्थेकडून आपल्या संस्थेला एक प्रकल्प मिळालेला आहे. भारत सरकारची कृषिविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुकास्तरावर समन्वयक नेमावयाचे आहे. प्रत्येकाला ९,५०० रुपये मासिक मानधन दिले जाईल. त्यांनी इच्छुकांची नावे नोंदवून त्यांना पोस्टाने पत्र पाठविले. पत्रावर ‘भारत सरकारच्या नियोजनाखाली जीकेव्हीएस, सालेकसा’, असे नमूद केले. पत्रातील मजकूर असा होता, ‘तोंडी परीक्षा व कागदपत्र पडताळणीकरिता ९ मार्च २०१७ रोजी सकाळी १० वाजता नागपूरच्या झाशी राणी चौकातील मोरभवन येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन येथे हजर राहावे. कागदपत्र पडताळणी आणि प्रशिक्षणाकरिता लागणारे ३,७०० रुपये शुल्क सोबत घेऊन यावे’, असा होता. पत्राच्या उजव्या बाजूस संस्थेचे नाव, पंजीयन क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल नमूद करण्यात आला होता.
९ मार्च रोजी बेरोजगारांनी मोरभवन येथे तोबागर्दी केली होती. या दोन्ही ठगबाजांनी प्रोजेक्टबाबत माहिती देताना सांगितले की, संस्थेला केंद्र सरकारकडून एक प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रोजेक्टअंतर्गत शिक्षित तरुणांना रोजगार देऊन शेतकऱ्यांपर्यंत कृषीबाबत माहिती पोहोचवणे आहे. यासाठी संस्थेचा करार शासनासोबत झाला आहे. या प्रोजेक्टच्या प्रशिक्षणासाठी ३,७०० रुपये लागतील.
प्रशिक्षण काळात राहण्याची व जेवणाची सोय संस्था करणार आहे. प्रशिक्षण झाल्यास लगेच काम सुरू होऊन प्रत्येकाला मासिक ९,५०० रुपये मानधन दिले जाईल. या ठगबाजांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून ३८० बेरोजगार तरुण व तरुणींनी प्रत्येकी ३७०० रुपये जमा केले. ठगबाजांनी त्यांना १८ ते २० मे या दरम्यान प्रशिक्षणही दिले.
शेवटच्या दिवशी त्यांनी तरुणांना शेतकऱ्यांकडे जाऊन १०१ रुपये घेऊन संस्थेचे सभासद करण्यास सांगितले होते. दररोज किमान ८ आणि महिन्याला २२४ सदस्य तयार करण्यास सांगितले. नेमून दिलेले टार्गेट पूर्ण करणाऱ्यांना नियमित करण्यात येईल, कमी सदस्य करणाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल, असे सांगून या ठगबाजांनी १४ लाख रुपये गोळा करून ३८० बेरोजगारांची फसवणूक केली.
महेंद्रकुमार नेपालजी क्षीरसागर रा. सेंदूरवाफा याच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० मे रोजी भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही ठगबाजांना २१ मे रोजी अटक केली.
न्यायालयात त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असता प्रकरण गंभीर असल्याने त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले.
न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील श्याम खुळे, अजय माहुरकर तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड.एम. एस. वकील, अ‍ॅड. एन.एस. वडियालवार यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक एम. पी. पुरी हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.
 

Web Title: Bumpers to the thugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.