जामठ्यात बुमराह पुनरागमन करणार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-२० सामना आज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:09 AM2022-09-23T05:09:20+5:302022-09-23T05:10:17+5:30
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-२० सामना आज : ‘डेथ ओव्हर’मधील गोलंदाजीचे शुक्लकाष्ठ संपणार?
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलामी लढतीत मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी शुक्रवारी दुसऱ्या सामन्यात ‘करा किंवा मरा’ या निर्धाराने उतरणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे.
‘डेथ ओव्हर’मधील स्वैर गोलंदाजी ही टीम इंडियापुढील मोठी डोकेदुखी आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर पाठदुखीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता असल्याने गोलंदाजीतील उणिवा काहीअंशी दूर होऊ शकतात. आशिया चषकात खेळू न शकलेल्या बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी स्थान देण्यात आले; मात्र मोहालीत अंतिम एकादशमध्ये तो खेळू शकला नव्हता. तो फिट आहे की नाही, हे सामन्याच्या काही मिनिटे आधी स्पष्ट होईल.
मुख्य फिरकी गोलंदाज असलेला युझवेंद्र चहल हादेखील आधीसारखा भेदक राहिलेला नाही. गेल्या काही सामन्यात तो अतिशय महागडा ठरला. रवींद्र जडेजा जखमी झाल्यामुळे त्याचे स्थान घेणाऱ्या अक्षर पटेलने मात्र पहिल्या सामन्यात तीन बळी घेत क्षमता सिद्ध केली.
भारतीय खेळाडूृंचे क्षेत्ररक्षणदेखील अतिशय सुमार दर्जाचे होते. मोहालीत तीन झेल सुटले. यावर सडकून टीका होत आहे. फलंदाजीत मात्र आक्रमकतेचा लाभ होत असला तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे अपयश पुन्हा चव्हाट्यावर आले.
फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या दिनेश कार्तिकला अधिक संधी दिली जात नाही. त्याला पुरेशी संधी मिळाल्यास विश्वचषकासाठी तो चांगला पर्याय ठरेल.
ऑस्ट्रेलिया संघ मात्र सुसज्ज वाटतो. डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, मार्क्स स्टोयनिस आणि मिशेल मार्श संघात नाहीत. विश्रांती घेणाऱ्या वॉर्नरच्या जागी आलेल्या कॅमेरून ग्रीनने चोख भूमिका बजावली. अनुभवी स्टीव्ह स्मिथ आणि टीम डेव्हिड यांनी भक्कम योगदान दिले, तर मॅथ्यू वेड हा फिनिशरच्या भूमिकेत दमदार ठरला. पाहुण्यांना गोलंदाजीत शिस्तबद्ध मारा करण्याचे आव्हान असेल. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि ग्रीन यांनी भरपूर धावा मोजल्या होत्या.
भारताला मुख्य चिंता आहे ती वेगवान माऱ्याची. यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने मागच्या १४ षटकात १५० धावा मोजल्या. अनुभवी भुवनेश्वर कुमारमुळे मोहालीत सामना गमवावा लागला. १९व्या षटकात तो बेभान चेंडू टाकतो. अशास्थितीत बुमराहची उपस्थिती संघासाठी अनिवार्य ठरते. विश्वचषकाआधी आणखी पाच सामने खेळून भारताला सर्व उणिवा दूर कराव्या लागतील. विश्वचषकाच्या तोंडावर फलंदाजीत आघाडीच्या तीन खेळाडूंचे अपयश आणि गोलंदाजीची समस्या कायम असून, फलंदाजीला अनुकूल भारतीय परिस्थितीत भारताचे गोलंदाज कमकुवत ठरताना दिसतात.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, ॲडम झम्पा, पॅट कमिुन्स, जोस हेजलवूड, सीन एबोट, डॅनियल सॅम्स.
...तर तिकिटांचे पैसे परत
तीन वर्षानंतर नागपुरात सामना होत असून, क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशातच वरुणराजाने आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरु होता. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्रानुसार सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडवर केंद्रीत आहे. २३ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेशावर केंद्रित राहील. मात्र, त्याचा जोर कमी झालेला असेल, असे मत केंद्राचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केले आहे. नागपूर आणि जवळपासच्या क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यात हा पाऊस संध्याकाळी राहू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजन पडण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने व्हीसीएने सामन्याचा पाच कोटींचा विमा काढला आहे. पावसामुळे सामन्यात एकही चेंडू पडला नाही तर प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत मिळतील.