बंडू धोतरेंचे कार्य लोकचळवळ व्हावी : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:38 PM2019-05-02T23:38:25+5:302019-05-02T23:39:06+5:30
मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानव विरुद्ध निसर्ग असे तिसरे युद्ध होणार आहे. यात मानव आक्रमक आणि निसर्ग बचावात्मक पवित्रा घेत आहे. स्वार्थासाठी पर्यावरण नासवले जात आहे. ऐतिहासिक वारसा ही पुढील पिढ्यांची कमाई असून बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूने या वारसाचे जतन करण्याचे आव्हानात्मक कार्य स्वीकारले आहे. त्यांचे कार्य लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमा मोटारसायकल रॅली नागपुरात पोहोचल्यानंतर इको प्रो या संस्थेचे बंडू धोतरे आणि त्यांच्या चमूचे स्वागत केले. यावेळी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, बंडू धोतरे, गोपाळराव ठोसर उपस्थित होते. सुरेश द्वादशीवार म्हणाले, चंद्रपूरच्या किल्ल्याची शोभा वाढावी यासाठी बंडू धोतरे आणि चमुने केलेले कार्य अभिमानास्पद आहे. ३५० वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षणाचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. जागतिक संघटना, धनवंत संघटनांनी स्वीकारावे असे हे आव्हान आहे. आज सरकारवर निसर्ग, ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सरकार स्वीकारत नसेल आणि बंडू धोतरेसारख्या तरुणांवर टाकत असेल, तर सरकारला काहीतरी वाटायला हवे. या कार्यात राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. गिरीश गांधी म्हणाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणे जिकिरीचे झाले आहे. राज्यकर्ते भौतिक स्वप्नात मग्न आहेत. बंडू धोतरेंचे कार्य मोलाचे आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नागपुरात १५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत, ही चुकीची बाब आहे. जंगल आणि मानव हे नाते वृद्धिंगत करण्याची गरज आहे. आज वृक्षारोपण कागदावरच होत आहे. झाडे किती जगली याचे ऑडिट होण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या बाबतीत राजकीय विचार बाजूला ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळराव ठोसर यांनी जंगलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन विकसित नसल्याचे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना बंडू धोतरे यांनी आम्ही केले ते इतरांना सांगण्यासाठी परिक्रमा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. प्रास्ताविक स्वानंद सोनी यांनी केले. संचालन अजय पाटील यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.