बंटी, बबली निर्दोष
By admin | Published: August 19, 2015 03:05 AM2015-08-19T03:05:41+5:302015-08-19T03:05:41+5:30
बंटी आणि बबली या नावांनी कुप्रसिद्ध झालेल्या तरुण आणि तरुणीची एका तरुणाला आत्महत्या करण्यास ...
तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा होता आरोप
नागपूर : बंटी आणि बबली या नावांनी कुप्रसिद्ध झालेल्या तरुण आणि तरुणीची एका तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
मोंटी ऊर्फ शुभम जयस्वाल (२०) आणि गुडिया ऊर्फ एव्हेनजेलिना ठाणेकर (१९), अशी आरोपींची नावे असून ते तुमसर भागातील रहिवासी आहेत. कैलास परिहार, असे मृताचे नाव होते. तो बजेरियाचा रहिवासी होता.
सरकार पक्षानुसार प्रकरण असे की, मोंटी आणि गुडिया हे दोघेही बहीण-भावासारखे राहत होते आणि नियमितपणे मुख्य रेल्वस्थानकासमोरील पांडे यांच्या हॉटेलमध्ये जेवण करायचे. नेहमीचे ग्राहक म्हणून त्यांची हॉटेलची स्वयंपाकी महिला जानकी परिहारसोबत ओळख झाली होती. एक दिवस मोंटीने जानकीला गुडियाचे लग्न करायचे आहे, एखादा मुलगा पहा, असे म्हटले होते. जानकीने आपल्याच एका मुलाचे लग्न करावयाचे आहे, असे त्यांना सांगितले होते. पुढे सोयरिक जुळून १७ जुलै २०१३ रोजी जानकीने आपला मुलगा कैलास याचे लग्न गुडियासोबत करून दिले होते. १८ रोजी थाटात स्वागतसमारंभ होऊन त्याच रात्री गुडिया आणि मोंटी हे दागिने, रोख आणि कपड्यांसह पसार झाले. या घटनेचा जबर मानसिक धक्का बसून कैलासने २१ जुलै २०१३ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी २७ जुलै २०१३ रोजी गुन्हा दाखल करून त्याच दिवशी दोघांनाही अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास होऊन आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, कैलासने आत्महत्या करावी, असा आरोपींचा उद्देश नव्हता. १८ जुलैच्या रात्री कैलासने दारूच्या नशेत गुडियाला जबर मारहाण केली होती. त्यामुळे ती मोंटीसह पळून गेली होती. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य ठरवून संशयाचा फायदा देऊन त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. चेतन ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पिंपळगावकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)