एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात

By दयानंद पाईकराव | Published: February 12, 2024 08:26 PM2024-02-12T20:26:29+5:302024-02-12T20:26:41+5:30

सिसीटीव्हीमुळे झाले उघड : गणेशपेठ, लकडगंज, तहसिलमध्येही चोरीची कबुली

Bunty-Babli , who stole from the ATM, is in the net of the police | एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात

एटीएममधून चोरी करणारे बंटी-बबली अजनी पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर : एटीएम मशीनमध्ये धागा व पट्टी टाकून नागरिकांचे पैसे चोरी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील बंटी-बबलीला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपींनी गणेशपेठ, लकडगंज व तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे एटीएममधून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

आदिल राजु खान (२०, रा. दत्तवाली, जि. फत्तेपुर, उत्तरप्रदेश) आणि प्रियंका सतविर सिंग (२१, रा. मुरादीपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरला लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून नुकसान करीत २ हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे चॅनल मॅनेजर स्वप्निल मारोतराव गभणे (३५, रा. नेहरुनगर सक्करदरा) यांनी सीसीटीव्ही पाहून अजनी ठाण्यात तक्रार दिली. ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज बावणे यांनी कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हा दाखल करून परिसरात शोध घेतला असता दोन्ही आरोपी आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशात राहतात. दोघेही बेरोजगार असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा बेत आखला. त्यासाठी ते रेल्वेने नागपुरात येऊन रेल्वेस्थानकावर मुक्काम करायचे. पहाटे किंवा रात्री ते एखाद्या एटीएम मशीनचा शोध घेऊन त्यात धागा व पट्टी टाकून ठेवायचे. एखादा ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर धागा व पट्टी टाकल्यामुळे त्याच्या खात्यातून पैसे वजा व्हायचे. परंतु एटीएममधून पैसे बाहेर येत नव्हते.

त्यामुळे तांत्रीक बिघाड असावा, असा विचार करून ग्राहक परत जात होते. ग्राहक केल्यानंतर आरोपी आपली शक्कल लढवून पैसे काढून घ्यायचे. अशा प्रकारे त्यांनी गणेशपेठ, तहसिल, लकडगंज ठाण्याच्या परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अजनी पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास अजनी पोलिस करीत आहेत.

Web Title: Bunty-Babli , who stole from the ATM, is in the net of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.