शेजारी राज्यांतही पसरलेय बंटी-बबलीचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:54+5:302020-12-17T04:36:54+5:30
नागपूर : अगरबत्ती व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांना फसविणाऱ्या बंटी-बबलीचे जाळे विदर्भासह शेजारी राज्यांमध्येही पसरले होते. परंतु, काही भ्रष्ट ...
नागपूर : अगरबत्ती व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून अनेकांना फसविणाऱ्या बंटी-बबलीचे जाळे विदर्भासह शेजारी राज्यांमध्येही पसरले होते. परंतु, काही भ्रष्ट नेते व पोलिसांमुळे सत्य पुढे येत नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
प्रमोद खेरडे व ममता मडके अशी बंटी-बबलीची नावे असून त्यांनी लोकांना १० लाख रुपयांनी फसविले असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. हे दोघे दीर्घ काळापासून विदर्भ, रायपूर, छिंदवाडा इत्यादी भागात ठगबाजी करीत होते. त्यांनी शहरातील १०० वर लोकांना फसविल्याचे बोलले जात आहे. अन्य जिल्ह्यांतील पीडित पुढे आल्यानंतर रकमेची संख्या कोटीमध्ये जाऊ शकते. हे आरोपी विरोधात जाणाऱ्या लोकांवर भ्रष्ट नेते व पोलिसांच्या मदतीने दबाव निर्माण करीत होते. त्यामुळे गिट्टीखदान पोलीस गुन्हा नोंदविण्यासाठी चार महिन्यांपासून मागे-पुढे पाहत होते. दोन दिवसांपूर्वी पीडित सारिका ठाकरे गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेल्या असता स्वत:ला आमदाराचा भाचा म्हणणारा एक युवक आरोपीच्या मदतीसाठी आला होता. दरम्यान, आरोपींनी सारिकाला तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला होता.
फसवणुकीद्वारे मिळविलेल्या रकमेतून आरोपी आलिशान जीवन जगत होते. ममताने सदरमध्ये किमती फ्लॅट भाड्याने घेतला आहे तर, प्रमोद मानेवाडातील आकाशनगरात राहतो. त्याच्याकडे दोन-तीन लक्झरी कार आहेत. आरोपींनी हुडकेश्वर येथील एका महिलेला १२.५० लाख रुपयांनी फसवले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.