संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

By योगेश पांडे | Published: July 19, 2023 12:18 PM2023-07-19T12:18:42+5:302023-07-19T12:21:27+5:30

माजी आमदार कोहळेंचे पुनर्वसन : निवडणूकींच्या तोंडावर उपराजधानीत तरुण नेतृत्वाला संधी

Bunty Kukde elected as the president of Nagpur city and Sudhakar Kolhe as district president | संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

googlenewsNext

नागपूर : मनपा, लोकसभा व विधानसभा निवडणूका समोर असताना भारतीय जनता पक्षाने विविध शहर व जिल्ह्याच्या अध्यक्षांची नावे घोषित केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे शहर असलेल्या नागपुरात आ. प्रवीण दटके यांच्या जागेवर माजी नगरसेवक बंटी कुकडे यांना संधी देण्यात आली आहे. तर मागील विधानसभा निवडणूकीत तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे पुनर्वसन करत त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी प्रकाशित केली आहे. यात कोहळे व कुकडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. २०१९ साली आ. प्रवीण दटके यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अगोदर ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची होती. त्यानंतर त्यांना पूर्णवेळ अध्यक्षपद देण्यात आले. त्यांच्याऐवजी कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याबाबत विविध कयास लावण्यात येत होते व अनेक जण इच्छुक होते. मात्र पक्ष नेतृत्वाने परत एकदा तरुण नेत्यावरच जबाबदारी दिली आहे.

मनपाच्या राजकारणात कुकडे अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. माजी नगरसेवक असलेले कुकडे हे मनपाच्या परिवहन समितीचे सभापतीदेखील होते. याशिवाय संघटनेत काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. भाजयुमोचेदेखील ते नागपूर शहराध्यक्ष होते. तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात पक्षाशी जोडण्याची भाजपची भूमिका असून त्यादृष्टीनेच कुकडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.

कोहळे परत सक्रिय राजकारणात

मुळचे शिक्षक असलेले सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपुरातून भाजपचे आमदार होते. तसेच त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाचीदेखील जबाबदारी होती. २०१९ साली त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली व त्यानंतर कोहळे हे पक्षसंघटनेतून काहीसे बाजूला झाल्याचे चित्र होते. त्यांच्याबाबत विविध राजकीय वावड्यादेखील उठल्या होत्या. त्यांचे परत पक्षाने राजकीय पुनर्वसन केले आहे.

Web Title: Bunty Kukde elected as the president of Nagpur city and Sudhakar Kolhe as district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.