सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मिहानचा भार; विकास खुंटला
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 24, 2024 10:59 PM2024-06-24T22:59:45+5:302024-06-24T23:00:31+5:30
- मोठ्या उत्पादन कंपन्यांची पाठ : मुख्यालय नागपुरात स्थापन करण्याच्या हालचाली
मोरेश्वर मानापुरे, नागपूर : नागपुरातील मिहान-एसईझेडचा विकास करणाऱ्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) नागपुरातील कार्यालयात ५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ३० टक्के निवृत्त, ५० टक्के कंत्राटी आणि २० टक्के नियमित अधिकारी आणि कर्मचारी आहेत. सर्वच वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त असून त्यांच्या खांद्यावर मिहानच्या विकासाचा भार आहे. त्यांच्यामुळेच मिहानचा विकास खुंटल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्याच कारणांनी मिहानचे मुख्यालय मुंबईतून नागपुरात हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याची झाल्याची माहिती आहे.
सेवानिवृत्तांना घरी बसवून नव्या उमेदीच्या तरुणांच्या हाती मिहानचा विकास सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिहानच्या सुरुवातीच्या काळात आणि आताही सेवानिवृत्त सरकारी अधिकारी वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. मार्केटिंगकरिता कुणीच नाही, पण ही धुरा आता काही महिन्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील सांभाळत आहेत. मार्केटिंग पदावर कार्य करणारे योगेश धारकर यांची बदली शिरडी येथे करण्यात आली आहे. नागपूर कार्यालयाचा कार्यभार अनेक वर्षांआधी सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले कार्यकारी अभियंते एसके चटर्जी सांभाळत आहेत. कार्यालयाचा फेरफटका मारला असता मिहानच्या विकासाची माहिती कुणीही देत नाही. ही विदर्भाच्या विकासाची शोकांतिका आहे.
मिहानचा विकास पुढे होणार वा नाही
आधी मिहानचा विकास संथगतीने व्हायचा. पण कार्यालयातील सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या कामाची गती पाहता मिहानचा विकास पुढे होणार वा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यालयातील सक्षम अधिकाऱ्यांना शिरडी, अमरावती आणि मुंबईत पाठवून निवृत्त अधिकाऱ्यांवर विकासाचा भार सोपविला आहे. आधीच मिहानच्या विकासाची गती खुंटली आहे. पुढे काय होणार, हे आता सांगणे कठीण असल्याचे काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले.
मोठ्या कंपन्या आणण्याकडे उदासिन, केवळ विमानतळाचा विकास मिहान-एसईझेडमध्ये नवीन उत्पादन कंपन्या आणण्याकडे एमएडीसीचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी उदासिन आहेत. केवळ अमरावती आणि शिरडी विमानतळाच्या विकासावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विमानतळाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी एमएडीसीचे अधिकारी कार्यरत आहेत. विमानतळाचा विकास करताना मिहानच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.