उपराजधानीतील ‘सिटी सर्व्हे’चा लाचखोर कर्मचारी अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:49 AM2019-11-15T10:49:01+5:302019-11-15T10:51:40+5:30
भूमापन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला एक लाख रुपये लाच मागण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमापन अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला एक लाख रुपये लाच मागण्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. आश्रय मधुकर जोशी (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो सर्व्हेअर म्हणून कार्यरत आहे. सहा दिवसांपूर्वी लावलेल्या सापळ्यातून निसटून जोशी पळून गेला होता. अखेर गुरुवारी तो एसीबीच्या हाती लागला.
तक्रारकर्ता उमरेड मार्गावरील भांडे प्लॉट चौकाजवळ राहतो. बापूनगरात त्याचा वडिलोपार्जित २६९३ चौरस फुटाचा भूखंड आहे. त्याचा कोर्टात वाद सुरू होता. १९९० मध्ये अतिरिक्त जमीन ८९४ चौरस फुटासाठी बापूनगर गृहनिर्माण सोसायटीसोबत त्यांच्या वडिलांचा व्यवहार झाला होता. त्यानुसार न्यायालयाने तक्रारकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ८९४ चौरस फूट जमीन ११४ क्रमांकाच्या भूखंडात समाविष्ट करण्यासाठी तक्रारकर्त्यांनी नगर भूमापन अधिकारी - २ यांच्या कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी भूमापक आश्रय जोशी याने तक्रारकर्त्यांकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय तो काम करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे तक्रारकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयात ५ नोव्हेंबरला तक्रार नोंदवली. त्याची शहानिशा झाल्यानंतर सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी ७ नोव्हेंबरला सर्व्हेअर जोशी यांना फोन करून लाचेचे एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. जोशीने त्यांना ८ नोव्हेंबरला वेगवेगळ्या ठिकाणी लाचेची रक्कम घेऊन बोलविले. दिवसभरात तीन ते चार स्थान बदलविल्यानंतर अखेर सक्करदरा येथील क्रिकेट मैदानाजवळ एक लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने सापळा लावला. ठरल्याप्रमाणे जोशीला जेरबंद करण्यासाठी एसीबीचे पथक तक्रारकर्त्यांच्या आजूबाजूला क्रिकेट मैदानाजवळ गोळा झाले. संशय येऊ नये म्हणून काही जण ट्रॅकसूटमध्ये होते. मात्र, जोशीला त्याची कुणकुण लागली की काय कळायला मार्ग नाही. तो लाचेची रक्कम न घेताच तेथून पळून गेला. त्याने आपला मोबाईलही स्वीच्ड आॅफ केला. त्यामुळे एसीबीचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी दुपारी तो त्याच्या घरी परतल्याचे कळताच एसीबीच्या पथकाने त्याला जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या घराचीही यावेळी झडती घेतली मात्र फारसे काही त्यांच्या हाती लागले नाही. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेंद्र दुद्धलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज उकंडे, हवलदार अशोक बैस प्रभाकर बेले, मंगेश कळंबे, वकिल शेख आदींनी ही कारवाई केली.
खाली एसीबी, वर सिटी सर्व्हे !
एसीबीच्या कार्यालयाच्या वरच्या माळ्यावरच भूमापन कार्यालय आहे. तेथे लाच दिल्याशिवाय कामच होत नाही, अशी अनेक वर्षांपासूनची ओरड आहे. अर्थात् या कार्यालयातील मंडळीवर एसीबीचा कसलाही धाक नसल्याचे म्हटले जाते. तर, या कार्यालयावर आमची नजर असल्याचे काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रपरिषदेत एसीबीच्या उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी म्हटले होते. पकडला गेलेला काही महिन्यांपूर्वीपर्यंत व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत होता. तो भाड्याच्या घरात राहतो, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.