नागपुरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड, १८ दुचाकींसह ६ आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:41 AM2022-06-25T11:41:43+5:302022-06-25T12:09:23+5:30
अटक करण्यात आलेल्या या सहा जणांनी धानाेली येथे दाेन घरफाेड्या केल्याची कबुली दिली असल्याचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी सांगितले.
नागपूर : ग्रामीण भागात दुचाकी वाहने चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चाेरट्यांच्या टाेळीतील सहा चाेरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ आणि गुन्ह्यात वापण्यात आलेल्या २ अशी एकूण १८ दुचाकी वाहने व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या वाहनांची एकूण किंमत १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. २४) करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे सहाही जण वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या वाहनांची पाहणी करून ती नियाेजनबद्धरीत्या चाेरून न्यायचे. ती वाहने चाबी न वापरता डायरेक्ट कनेक्शन करून सुरू करायचे. याची माहिती त्यांनी यू-ट्यूबवरून आत्मसात केली हाेती. चाेरून नेलेल्या वाहनांच्या मूळ नंबर प्लेट त्यांनी फेकून दिल्या हाेत्या. त्यामुळे पाेलिसांनी ट्रीय गुन्हे अभिलेख प्रणालीच्या नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्युराेच्या पाेर्टलवरून या वाहनांच्या नाेंदणी क्रमांकाची पडताळणी केली.
अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांमध्ये निखिल ज्ञानेश्वर पुडके (२०, रा. धानाेली, ता. माैदा), तेजस ज्ञानेश्वर झाडे (२१, रा. बाेरी गाेवारी, ता. माैदा), भावेश किशाेर जुनघरे (१८), पीयूष अजय मस्के (१९), मयूर माेरेश्वर भाेयर (१९) व सुयश दिवाकर भिसेकर (१९) चाैघेही रा. वडाेदा, ता. कामठी या सहा जणांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहन चाेरीचे प्रमाण वाढत असताना स्थानिक गुन्हे शाखेने या घटनांचा समांतर तपास करायला सुरुवात केली हाेती.
या वाहन चाेरीत निखिलचा सहभाग असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तातडीने माैदा परिसरातून ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने गुन्ह्यांची माहिती देत साथीदारांची नावेही सांगितली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उर्वरित पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीची १८ दुचाकी वाहने तसेच पाच माेबाईल फाेन जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
दाेन घरफाेड्यांची कबुली
अटक करण्यात आलेल्या या सहा जणांनी धानाेली येथे दाेन घरफाेड्या केल्याची कबुली दिली असल्याचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी सांगितले. त्यांच्याकडून बुलेट, स्प्लेंडर प्लस, पॅशन, पल्सर, ॲक्टिव्हा, ज्युपिटर या वाहनांसह पाच माेबाइल फाेन जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी ही वाहने माैदा, उमरेड, कुही व नंदनवन नागपूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरून नेली हाेती. आराेपी निखिल पुडके याच्याकडे साेन्याची लगडही आढळून आली.