घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक, एक फरार; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त , गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कामगिरी
By दयानंद पाईकराव | Published: June 30, 2024 03:44 PM2024-06-30T15:44:18+5:302024-06-30T15:44:30+5:30
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी धनंजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला विधीसंघर्षग्रस्त साथीदार व आरोपी चेतनसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.
नागपूर : घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने बेड्या ठोकून त्याच्या एका विधीसंघर्षग्रस्त साथीदाराला ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. आरोपीच्या ताब्यातून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धनंजय लेनुराम मार्कंड्येय (२८, रा. विजयनगर, कळमना मार्केट), चेतन पाल उर्फ बौना (२५) एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी धनंजयला अटक करण्यात आली असून विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी चेतन अद्याप फरार आहे. २३ ते २५ जून २०२४ दरम्यान नितीन दयवंतराव कळसकर (४६, रा. जामदारवाडी, न्यु मंगळवारी, यशोधरानगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह रामेश्वरी येथे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घरातील ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी धनंजयला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला विधीसंघर्षग्रस्त साथीदार व आरोपी चेतनसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ५ मोबाईल, लॅपटॉप, चार्जर, ब्ल्यू टुथ स्पिकर, हेअर ट्रीमर असा एकुण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.