नागपुरातील गोळीबार चौक अन् लालगंज परिसरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:25 PM2019-05-08T23:25:50+5:302019-05-08T23:27:02+5:30
मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे.
मन्सूर फक्रुद्दीन चौधरी (५०) हे भारतमाता चौकाजवळ भाड्याने राहतात. त्यांचा हार्डवेयरचा व्यवसाय आहे. कुटुंबात पत्नी अल्फिया आणि तीन मुली आहेत. मन्सूर एका ओळखीच्या व्यक्तीसोबत हार्डवेयरचे काम करतात, तर अल्फिया या प्लास्टिकच्या वस्तू ऑनलाईन विक्री करतात. तिन्ही मुलींच्या लग्नासाठी त्यांनी दागिने खरेदी करून ठेवले होते. २००७ मध्ये दुबई येथून आल्यानंतर ते नागपुरातच स्थायिक झाले.
मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता मन्सूर आणि अल्फिया मुलींसह रमजानची नमाज अदा करण्यासाठी बोहरा मशीद येथे गेले होते. या दरम्यानच चोरांनी आपले काम केले. चोरांनी अगोदर मन्सूर यांच्या शेजारी राहणाऱ्या घराचे कुलूप तोडले. तिथे कुठलीही किमती वस्तू न मिळाल्याने त्यांनी मन्सूरच्या घराचे कुलूप तोडले. घराच्या आलमारीचेही कुलूप तोडले. त्यात ६० तोळे सोन्याचे दागिने आणि ५५ हजार रुपये चोरून नेले. रात्री ८.३० वाजता मन्सूर कुटुंबीय घरी परत आले. कुलूप तुटलेले पाहून त्यांना धक्का बसला. आत गेले तेव्हा आलमारी व लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. हे सर्व पाहून अल्फिया बेशुद्ध झाल्या. तहसील पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. परिसरातील जाणकार व्यक्तीने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळ हा रहिवासी परिसर आहे. बाहेरचा गुन्हेगार येथे येऊन चोरी करणे शक्य नाही. आरोपींना चौधरी दाम्पत्य व शेजारी दोन तासानंतरच घरी परत येतील याची माहिती होती. त्यामुळे त्याने सहजपणे आपले काम केले. सोन्याची सध्याची किंमत जवळपास १५ लाख रुपये आहे. परंतु पोलिसांनी त्याची किंमत ४ लाख इतकी लावली आहे.
दुसरी घटना मस्कासाथ येथील तेलीपुरा येथे घडली. डॉ. राजेश लक्ष्मीकांत जैन हे तेलीपुरा पेवठा येथे राहतात. ७ मे रोजी रात्री भाचीच्या लग्नासाठी ते जबलपूरला गेले होते. यादरम्यान चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ७८ हजार रुपये आणि ५० हजार रुपयाचे दागिने चोरून नेले. बुधवारी सकाळी डॉ. जैन घरी परत आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. शांतिनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मेरिटमध्ये आली मुलगी
मंगळवारी चौधरी दाम्पत्यांची मुलगी नकिया हिने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केले. यामुळे चौधरी दाम्पत्य दुपारपासूनच आनंदात होते. परंतु सायंकाळी जीवनभराची कमाई एका झटक्यात गमावल्याने चौधरी दाम्पत्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. ५६ हजार रुपये मुलीच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी ठेवले होते.