उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 02:34 PM2022-05-16T14:34:23+5:302022-05-16T14:37:22+5:30

मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते.

burglary in more than 37 houses in 15 days In Nagpur | उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे४० टक्के प्रकरणांत मालक बाहेरगावी गेलेले घर ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने उपराजधानीतील अनेकजण कुटुंबासह बाहेरगावी जातात. यावेळी कितीही दक्षता घेतली तरी चोरट्यांच्या नजरा अशा घरांचा शोध घेतच असतात अन् संधी मिळताच ते त्यांना ‘टार्गेट’ करतात. मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. अनेकजण गच्चीवर झोपण्याचा आनंद घेतात तर काहीजण बाहेरगावी जातात. अशावेळी घराला कुलूप लावून जाणेदेखील सुरक्षित नसते. घरात लोक असतानाही चोरांनी घरात शिरून चोरी केल्याच्या घटना घडतात. शिवाय कुलरच्या आवाजामुळे अगदी बाजूच्या खोलीत काय सुरू आहे, याची कल्पनादेखील येत नाही. यामुळे चोरांचे काम आणखी सोपे होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हे नोंदीनुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३७ हून अधिक प्रकरणांत चोरांनी घर किंवा इमारतीच्या आत शिरून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील १५ हून अधिक गुन्ह्यांमध्ये घरमालक कुलूप लावून लग्नसमारंभ अथवा गावाला गेले होते. घरी परत आल्यावरच त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. अद्यापही बहुतांशी घरे व कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही नाही. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यातही अनेक अडथळे येतात.

हुडकेश्वर, बजाजनगर, बेलतरोडी ‘टार्गेट’

शहर पोलिसांच्या गुन्हे नोंदीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसात घरात शिरून चोरीच्या सहा घटना घडल्या. बजाजनगर पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे चार गुन्हे नोंदविण्यात आले. तर बेलतरोडी, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घरात शिरून चोरी किंवा घरफोडीच्या प्रत्येकी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

‘सोशल मीडिया’वरील ‘अपडेट्स’ टाळा

सबकुछ ऑनलाईनच्या जमान्यात अनेकजण बाहेरगावी जाताना अगदी ‘सेल्फी’सह सर्व ‘अपडेट्स’ टाकतात. यामुळे अनेकांना तुम्ही कुठे व किती दिवसांसाठी गेला आहात, याची कल्पना येते. चोरांना अशा ‘अपडेट्स’ मिळाल्या तर त्यांच्या हाती आयते कोलीतच सापडते. त्यामुळे अशाप्रकारच्या ‘अपडेट्स’ टाळल्या पाहिजेत, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

Web Title: burglary in more than 37 houses in 15 days In Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.