यू ट्युबवरून घेतले घरफोडीचे धडे : नागपुरात उच्चशिक्षित बंटी-बबली गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:27 AM2019-10-30T00:27:40+5:302019-10-30T00:28:39+5:30
हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. शैलेश वसंत डुंबरे (वय २९, रा. संतकृपानगर, हजारी पहाड) आणि प्रिया ऊर्फ पियू (वय २१, रा. बजाजनगर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे.
शहरात गेल्या काही महिन्यात पुन्हा घरफोडीची मालिका सुरू झाली होती. बहुतांश गुन्ह्यात ऑरेंज कलरच्या कारचा वापर झाल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी तो धागा पकडला. मानकापूर पोलिसांना तशी एक कार गोरेवाडा येथील एका बंगल्यात दिसली. तेथे राहणारा शैलेश आणि प्रिया यांच्या हालचालीही संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी या दोघांना चार दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांनी अनेक घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एका कारसह सुमारे दहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
स्वप्नपूर्तीसाठी गुन्हे !
शैलेशने एमबीए केले असून प्रियाने बीएफए केले आहे. अशा प्रकारे दोघेही उच्चशिक्षित असले तरी मनासारखा पैसा रोजगारातून मिळत नाही. त्यामुळे अलिशान कार आणि बंगल्यात राहण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याचे पाहून त्यांनी स्वप्नपूर्तीसाठी घरफोडीचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्यांनी यू ट्युबवरून घरफोडीचे धडे घेतले. त्यासाठी लागणारे गॅस सिलिंडर, पाईप, कटर, पेचकस असे साहित्यही विकत घेतले अन् एका पाठोपाठ सहा घरफोड्या केल्या. त्यातून त्यांनी विकत घेतलेली कार, दोन लॅपटॉप, सोन्याची लगडी, अमेरिकन चलन (डॉलर्स) असा एकूण ९ लाख, ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.