एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडली: साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 08:28 PM2019-07-25T20:28:10+5:302019-07-25T20:29:27+5:30
एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
विशांत राजकुमार मेश्राम (वय ३१, रा. भीम चौक, नागपूर) यांचे एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर ११८ क्रमांकाच्या गाळ्यात लॅपटॉप आणि मोबाईल शॉपी आहे.२३ जुलैला रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले. बुधवारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आतमधील मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क, मदरबोर्ड आणि काऊंटरमधील दोन हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी काचेच्या दाराचे नट बोल्ट उघडून आत प्रवेश केला आणि ही चोरी केली. मेश्राम यांनी या प्रकाराची तक्रार गणेशपेठ ठाण्यात नोंदवली. त्यावरून गणेशपेठ पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. या चोरीत सहभागी असणाऱ्या काही संशयितांची नावेही त्यांनी तक्रारीत नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दोन संशयितांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पोलिसांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी सर्वप्रथम तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागू शकले नाही. एम्प्रेस मॉलसारख्या पॉश आणि मोठ्या व्यापारी संकुलातील दुकानांचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळल्याने काही वेळेसाठी पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला.