अंत्यसंस्काराला गेलेल्या महिलेकडे घरफोडी, सीसीटीव्हीमुळे चोर पोलिसांच्या हाती
By योगेश पांडे | Published: August 30, 2023 02:58 PM2023-08-30T14:58:29+5:302023-08-30T15:00:06+5:30
१.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या एका महिलेकडे घरफोडी करणाऱया चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा शोध लागला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
२० ऑगस्ट रोजी कल्पना हरीश्चंद्र घोडे (५२, सोमवारी क्वॉर्टर) या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी मुळगावी गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून बेडरूममधील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख ४० हजार असा एकूण १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सक्करदरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ते फुटेज तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे रितेश अश्वजित वानखेडे (१९ रामबाग, पाचनल चौक) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने दोन अल्पवयीन साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल व दुचाकी असा १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे रितेशने घरफोडीदरम्यान वापरलेली दुचाकीदेखील ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.