घरफोडी - वाहनचोरी करणाऱ्या आरोपींना अटक, आठ गुन्हे उघडकीस
By योगेश पांडे | Published: July 10, 2024 03:38 PM2024-07-10T15:38:16+5:302024-07-10T15:38:48+5:30
Nagpur : अल्पवयीन आरोपींचादेखील समावेश
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरफोडी तसेच वाहनचोरीत सहभागी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
४ जुलै रोजी निशांत संजय खरे (२३, बोरकरनगर, ईमामवाडा) याची दुचाकी त्याच्या घरासमोरून चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनकडून समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या तीन सहकाऱ्यांसोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विक्की उर्फ बिट्टू योगेश डेहेरिया (२२, झाडे चौक, शांतीनगर), पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे (१९, धम्मदीपनगर, यशोधरानगर) यांना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपींनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमांशू मोबाईल शॉपी, साई पान पॅलेस, अमन पान पॅलेस व धानवी पान पॅलेस येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी पोलीस ठाणे सावनेर येथील राज कमल चैक येथे चोरी केल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या आणखी एका साथीदारासोबत उमरेडमधील इतवारीपेठ व कोठारी ले आऊटमध्ये घरफोडी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून दोन दुचाकी, मोबाईल व रोख असा ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक मुकूंद ठाकरे, मधुकर काठोके, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकुर, जितेश रेड्डी, दिपक
दासरवार, दिपक लाखडे, विषाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अल्पवयीन मुलाच्या साथीने घरफोडी
२३ जून रोजी अक्रम खान मोहम्मद खान (४०, यशोधरानगर) हे जालना येथे सासुरवाडीला गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून २.४६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने यश उर्फ धम्मदीप गोपाल उईके (२३, संजय गांधीनगर) याच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.