जळीत रुग्णांचे वाचणार जीव! मेयो, मेडिकलमध्ये ‘बर्न वॉर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 12:26 PM2021-08-25T12:26:26+5:302021-08-25T12:26:48+5:30

Nagpur News आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्येही अद्ययावत ‘बर्न वॉर्ड’ नाही. मेयोचीही हीच स्थिती आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मेयो, मेडिकलमध्ये संपूर्ण सोयीयुक्त ‘बर्न वॉर्ड’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Burn patients to be saved! ‘Burn Ward’ in Mayo, Medical in Nagpur | जळीत रुग्णांचे वाचणार जीव! मेयो, मेडिकलमध्ये ‘बर्न वॉर्ड’

जळीत रुग्णांचे वाचणार जीव! मेयो, मेडिकलमध्ये ‘बर्न वॉर्ड’

googlenewsNext
ठळक मुद्दे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील जिल्हास्तरावर जळीत रुग्णांसाठी विशेष सोय नाही. अशा रुग्णांना लांब अंतर कापून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी यावे लागते. आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्येही अद्ययावत ‘बर्न वॉर्ड’ नाही. मेयोचीही हीच स्थिती आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मेयो, मेडिकलमध्ये संपूर्ण सोयीयुक्त ‘बर्न वॉर्ड’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जळीत रुग्णांवर अद्ययावत उपचार होऊन त्यांचा जीव वाचण्याची शक्यता अधिक होणार आहे. (Burn patients to be saved! ‘Burn Ward’ in Mayo, Medical in Nagpur)

उपराजधानीत मिहान व एमआयडीसी परिसरात कंपन्यांची संख्या वाढत आहे. दरवर्षी कुठे ना कुठे स्फोट किंवा आगीची दुर्घटना घडतेच. परंतु मोठ्या संख्येतील जखमी रुग्णांसाठी नागपूर जिल्ह्यातच नाही तर विदर्भात प्रभावी उपचाराची सोय नाही. मेयो, मेडिकलमध्ये जळालेले रुग्ण मोठ्या संख्येत येतात. या दोन्ही रुग्णालयात एक-एक वॉर्ड आहे. परंतु येथे सोयींचा अभाव आहे. यामुळे हवेची हलकी झुळुकेनेही रुग्णांच्या वेदनेचा स्फोट होतो. शिवाय, हवेतून, संपर्कातून जंतूसंसर्गाचा धोका वाढतो. अनेक वेळा याच कारणांमुळे रुग्णांचा जीव जातो. यामुळेच की काय दोन्ही रुग्णालयात मृत्यूची टक्केवारी जवळपास ५० टक्क्यांवर आहे. यामुळे खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी अद्ययावत बर्न वॉर्ड उभारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी झालेल्या मुंबई येथील सर्व अधिष्ठात्यांच्या बैठकीत त्यांनी मेयो, मेडिकलला याबाबतचा प्रस्तावही पाठविण्याचा सूचना केल्या.

- १०० पेक्षा अधिक किलोमीटरवरून आलेल्या १७० रुग्णांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्लास्टिक सर्जरी विभागाने नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीतील जळीत रुग्णांच्या मृत्यूचा अभ्यास केला. यात १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून मेडिकलमध्ये आलेल्या १७० रुग्णांचा, ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ४८ रुग्णांचा, तर १० ते ५० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. यामुळे अद्ययावत ‘बर्न वॉर्ड’ मेडिकलसाठी किती महत्त्वाचे, हे यावरून दिसून येते.

- प्रकल्पाचा प्रस्ताव नव्याने सादर

जखमी रुग्णांसाठी प्रभावी उपचाराची सोय होण्यासाठी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१७ मध्ये ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रीव्हेशन ॲण्ड मॅनेजमेंट ऑफ बर्न इन्जुरीज’ या प्रकल्पास मान्यता दिली. जवळपास ४० कोटी रुपयांचा हा प्रकल्प मेडिकलमध्ये होणार होता. यातील ६० टक्के वाटा केंद्राने तर ४० टक्के वाटा राज्य शासनाने उचलायचा होता. मात्र यांच्यात सामंजस्य करारच (एमओयू) झाला नाही. त्यामुळे पुढे हा प्रकल्प रखडला. आता याच प्रकल्पाला नव्याने सादर केला जाणार आहे. सोबतच १२ खाटांचा अद्ययावत वॉर्डाचाही प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आहे.

-लवकरच प्रस्ताव पाठविणार

मेडिकलमध्ये सर्व सोयीने सज्ज असलेले ‘बर्न वॉर्ड’ तयार करण्याचा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रस्ताव तयार केला जात असून, लवकरच हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जणार आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल

Web Title: Burn patients to be saved! ‘Burn Ward’ in Mayo, Medical in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य