राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लवकरच ‘बर्न’चाही होणार समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 07:32 PM2022-02-11T19:32:17+5:302022-02-11T19:36:16+5:30

Nagpur News राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जळीत रुग्णांवरील उपचारांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

Burn will soon be included in the National Health Program | राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लवकरच ‘बर्न’चाही होणार समावेश

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लवकरच ‘बर्न’चाही होणार समावेश

Next
ठळक मुद्दे‘आयसीएमआर’कडून जळीत रुग्णांचा अभ्यास नागपूरसह देशातील दहा वैद्यक संस्थांकडे जबाबदारी

नागपूर : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग निर्मूलन, क्षयरोग नियंत्रण, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, लसीकरण, कुटुंब कल्याण मोहीम आदी राबविले जात असताना लवकरच यात जळीत रुग्णांवरील उपचारांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. याची तयारी म्हणून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व राम मनोहर लोहिया (आरएमएल) हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरसह देशातील दहा वैद्यकीय संस्था जळीत रुग्णांचा अभ्यास करणार आहेत.

वाढते शहरीकरण, वाढते उद्योगधंदे, वाढते तापमान व अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याने आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा जळीत रुग्णांची विविध माहिती संकलित करण्यासाठी ‘आयसीएमआर’ व ‘आरएमएल’ हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. सर्वेक्षणासाठी पटना एम्स, चंदीगड, लखनौ, भुवनेश्वर, इम्फाळ, चेन्नई, श्रीनगर, जयपूरसह मुंबईत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, तर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) निवड करून त्यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या वैद्यकीय संस्था सलग चार वर्षे शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येकी १७०० नुसार ३४०० घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील.

जळीत घटना, उपचार, सोयी याची घेतली जाणार माहिती

या उपक्रमात सहभागी असलेल्या वैद्यकीय संस्थेला मागील वर्षी जळण्याच्या घटना, जळण्याचा प्रकार, उपचार, त्यावर झालेला खर्च, जळीत रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, उपचाराच्या सोयीसुविधा, जळीत रुग्णांचे जीवनमान आदींच्या माहितीचा अभ्यास केला जाणार आहे. शिवाय, प्राथमिक उपचाराची जनजागृती केली जाणार आहे. जनजागृतीचा किती प्रभाव पडला, हे सुद्धा तपासले जाणार आहे.

 लवकरच सर्वेक्षणाला सुरुवात

जळीत रुग्णांचा अभ्यास करणाऱ्या या सर्वेक्षणाचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. समीर भट्टाचार्य व डॉ. निकम रॉय हे आहेत. नागपूर मेडिकलच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग व प्लास्टिक सर्जरी विभाग मिळून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. सुरेंद्र पाटील व जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार हे को-प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत. लवकरच या सर्वेक्षणाला सुरुवात होईल.

- डॉ. उदय नारलावार, प्रमुख जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

Web Title: Burn will soon be included in the National Health Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य