द बर्निंग कार, अलंकार चौकात थरार
By admin | Published: July 5, 2017 01:40 AM2017-07-05T01:40:17+5:302017-07-05T01:40:17+5:30
धावत्या कारला भीषण आग लागल्याने अलंकार चौक परिसरात मंगळवारी रात्री मोठा थरार निर्माण झाला होता.
कुणाला दुखापत नाही : बीएमडब्ल्यूचे लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या कारला भीषण आग लागल्याने अलंकार चौक परिसरात मंगळवारी रात्री मोठा थरार निर्माण झाला होता. कारमालक आणि तेथील पोलिसांसह अनेकांनी समयसूचकता दाखवल्यामुळे कारची आग विझविण्यात तातडीने यश मिळाले आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, आगीमुळे कारचे लाखोंचे नुकसान झाले.
ही बीएमडब्ल्यू कार (एमएच ३१/ डीसी ०००७) धंतोलीतील डॉ. सुधीर नेरळ यांच्या मालकीची आहे. डॉ. नेरळ आपल्या मित्रासोबत मंगळवारी रात्री ७ ते ७. ३० च्या सुमारास अलंकार चौकातून जात होते. सेंट्रल मॉल जवळच्या सिग्नलवर अचानक कारच्या बोनेटमधून आगीचा भडका उडाला.
यावेळी चौकात चारही बाजूला वाहनधारकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे कारची आग पाहून चौकात एकच गोंधळ उडाला. काही वेळेसाठी वाहतुकीतही अडसर निर्माण झाला. प्रसंगावधान राखत डॉ. नेरळ यांनी लगेच सुरक्षित ठिकाणी कार थांबवली. त्यानंतर ते स्वत:, मनोज पंचबुद्धे, पोलीस कर्मचारी मनोजसिंग ठाकूर यांच्यासह आजूबाजूच्या अनेकांनी कारला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे कारची आग विझविण्यात तातडीने यश आले. या आगीमुळे कुणाला दुखापत झाली नाही. मात्र, कारचे लाखोंचे नुकसान झाले. काही वेळेसाठी वाहतुकीचीही कोंडी झाली. वाहतूक शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी काही वेळेतच वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार बीएमडब्ल्यूचे ३ लाख, ५० हजारांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात कार पुरती निकामी झाली अशी माहिती डॉ. नेरळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.