साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:01 PM2019-04-22T12:01:54+5:302019-04-22T12:02:36+5:30

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर निराधार आरोप लावून त्यांचा अपमान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात जय जवान जय किसान संघटना, असंघटित कामगार कॉंग्रेसने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.

The burning of the statue of Sadhvi Pragya Thakur in Nagpur | साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन

Next
ठळक मुद्देजय जवान जय किसान संघटना व असंघटित कामगार काँग्रेसतर्फे वक्तव्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान शहीद हेमंत करकरे यांच्यावर निराधार आरोप लावून त्यांचा अपमान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद नागपूर शहरात उमटत असून जय जवान जय किसान संघटना,असंघटित कामगार कॉंग्रेसने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
लक्ष्मीभुवन चौकात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साध्वीच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजपा नेते राष्ट्रप्रेम, देशभक्तीच्या गोष्टी करतात. परंतु, देशाचे रक्षण करणारे पोलीस आणि जवानांबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. शहिदाबाबत वक्तव्य करणारी व्यक्ती साध्वी राहूच शकत नसल्याचे सांगून शहिदांच्या अपमानाबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी आणि निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी. सोमवारपर्यंत भाजपाने निर्णय न घेतल्यास संघ मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. यावेळी अरुण वनकर, मिलिंद महादेवकर, शेखर शिरभाते, रवींद्र इटकेलवार, राजेंद्र भोयर, शरद शाहु, आकाश थेटे, नरेंद्र सारवे, प्रकाश मेश्राम, नीलेश कोल्हे उपस्थित होते. दरम्यान, असंघटित कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष युगल विदावत यांनी मतांचे राजकारण करण्यासाठी भाजप शहिदांचा वापर करीत असल्याचे सांगून शहीद, सैनिक आणि पोलिसांवरील आरोप कॉंग्रेस सहन करणार नसल्याचे सांगितले. कोणतेही पुरावे नसताना शहिदांवर आरोप करून त्यांच्याकडे बोट दाखविणाऱ्यांचा त्यांनी यावेळी निषेध केला. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. यावेळी दुर्गा लाहोरी, धीरज पांडे, रिजवान रुमवी, गुड्डु नेताम, विमलेश, सचिन, अबरार पटेल उपस्थित होते.

साध्वींना मत मांडण्याचा अधिकार : मा. गो. वैद्य
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिलेली प्रतिक्रिया हा त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय प्रचार प्रमुख मा. गो. वैद्य यांनी म्हटले आहे. आरोप असलेले अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यामुळे साध्वी यांच्या उमेदवारीत काहीच आक्षेपार्ह नाही. त्यांच्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांनी साध्वी विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा, असे वैद्य यांनी म्हटले आहे.

Web Title: The burning of the statue of Sadhvi Pragya Thakur in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.