नागपुरात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह ; घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 10:39 AM2022-03-17T10:39:28+5:302022-03-17T10:54:03+5:30
घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे.
नागपूर : सुराबर्डी परिसरातील निर्जन ठिकाणी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रेताशेजारीच पेट्रोलची रिकामी बाटली आढळली. यावरून तिचा आधी खून करून नंतर जाळले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
निकिता लखन चौधरी (वय २२, गेडाम ले-आऊट, प्रतापनगर) असे युवतीचे नाव आहे. ती खामलामधील एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होती. मंगळवारी सकाळी ती कार्यालयात गेली. सायंकाळी पाच वाजता घरी जाण्यासाठी निघाली. परंतु ती घरी न पोहोचल्यामुळे कुटुंबीय घाबरले. मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी प्रतापनगर पोलिसात मिसिंगची तक्रार दिली.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजता सुराबर्डीच्या निर्जनस्थळी बकरी चारणाऱ्या व्यक्तीला युवतीचा जळालेला मृतदेह आढळला. त्याने उपसरपंचांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, निरीक्षक लता तोडासे घटनास्थळी पोहोचल्या.
घटनास्थळी मृतदेहाजवळ एक बॅग व पाण्याची बॉटल पडलेली होती. यावरून आरोपी निकिताच्या जवळचा असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणला असावा, अशीही शंका आहे. एमबीए केल्यानंतर निकिता नोकरी करीत होती. तिचे कुटुंबीयही शिक्षित आहेत.
तिच्या बॅगमधील कागदपत्रांवरून प्रतापनगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगमधील तरुणीचा हा मृतदेह असल्याचे समजले. निकीताची पेट्रोल ओतून निर्घृणपणे हत्या का करण्यात आली, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.