नागपुरात शॉर्ट सर्किटमुळे बस जळाली : लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:05 AM2019-05-29T00:05:31+5:302019-05-29T00:06:11+5:30
प्रवाशांनी भरलेल्या सिटी बसला मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली. बसच्या समोरील भागातून धूर निघताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पण चालक आणि वाहकाच्या दक्षतेमुळे जीवहानी टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांनी भरलेल्या सिटी बसला मंगळवारी सकाळी ६.३० वाजता अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने आग लागली. बसच्या समोरील भागातून धूर निघताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पण चालक आणि वाहकाच्या दक्षतेमुळे जीवहानी टळली.
बसमधून निघू लागताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि अग्निशमन दलाला सूचना दिली. बस जळाल्यामुळे मनपाच्या वाहतूक विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणा डेपोतून सीताबर्डीकडे बस क्रमांक एमएच-३१ सीए ६२४५ निघाली. बालाजीनगर भागात बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसमधून धूर निघू लागला. त्यानंतर आग लागली. प्रारंभी धूर निघताच बसचालक मनीष करांगळे आणि वाहक अमितने सर्वप्रथम बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तात्काळ बसमधील सर्व १५ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली. दहा मिनिटातच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत बसचा बहुतांश भाग जळाला होता. कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते.
मनपातर्फे ऑपरेटरला दिलेली ही बस स्टॅण्डर्ड होती. देखभाल आणि दुरुस्ती करूनच या बसेस रस्त्यावर चालविण्यात येत आहेत. पण यातील बहुतांश बसेस चालविण्यास अकार्यक्षम आहेत. ही घटना वेळेत लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती. अकार्यक्षम बसेसला ताफ्यातून तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.