भरधाव बस कंटेनरला धडकली, चालकासह १२ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:51+5:302021-07-15T04:06:51+5:30
कामठी : नागपूर येथून साकोलीकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. तीत चालकासह १२ प्रवासी ...
कामठी : नागपूर येथून साकोलीकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. तीत चालकासह १२ प्रवासी जखमी झाले. नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सावळी शिवारात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मौदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक रवींद्र विक्रम जांगडे हे नागपूर बसस्थानकावरून प्रवासी घेऊन साकोली आगाराची बस क्रमांक एमएच-४०/ एन-९५६७ ने मौदा-भंडारामार्गे साकोलीकडे जात होते. दरम्यान, कामठी तालुक्यातील सावळी बसथांब्याजवळ भरधाव वेगात जात असलेल्या कंटेनरवर रोडच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर उभ्या असलेल्या एका वेडसर तरुणाने दगड मारला. लागलीच चालकाने कंटेनरचा वेग कमी केली. याचदरम्यान मागून येणाऱ्या बस चालकाने बसचे ब्रेक लावले असता अनियंत्रित बस कंटेनरवर जाऊन धडकली. यानंतर ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. बसची धडक लागताच कंटेनर चालक भंडाऱ्याच्या दिशेने पसार झाला. या अपघातात बस चालक रवींद्र विक्रम जांगडे यांच्या दोन्ही पायांना गंभीर जखम झाली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात किसन कातोरे (रा. पिंपरी पुनर्वसन, जि. भंडारा), कवडू विठोबा भुते (ता. पवनी, जि. भंडारा), बुधा सोनबा भुते (रा. सुभाष वाॅर्ड, ता. पवनी, जि. भंडारा), राजकुमार प्रल्हाद जांभूळकर (रा. विहीरगाव, ता. लाखनी), चरण घनश्याम मेश्राम (रा. देवाटोला, ता. देवरी, जि. गोंदिया), अमोल कठाणे (रा. वडोदा, ता. कामठी), शरद देवीदास व्यवहारे (रा. मौदा), दिनेश शंकर भुरे (रा. सेलू), दिनेश शंकर भुरे (मु. सेलू, ता. कामठी), विष्णू अंताराम बनकर (रा. न्यू शिवाजीनगर, भंडारा), मुकेश श्रीधर रामटेके (रा. तारिकनगर, भंडारा), नारायण संपत साळवे (रा. वरठी, जि. भंडारा), माधुरी कठाणे ही बस कंडक्टर किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मौद्याचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी व कामठी येथील भाजप युवा मोर्चाचे महासचिव योगेश डाफ, लोकेश माळोदे, धनराज माळोदे आदींनी बसमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने भंडारा येथे रवाना केले. यातील काहींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली.
वाहतूक विस्कळीत
नागपूर- भंडारा महामार्गावर दुपारी झालेल्या या अपघाताने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.