तिकिटाचे पैसे मागितले म्हणून धावत्या बसमध्ये कंडक्टरवर चाकूने हल्ला
By जितेंद्र ढवळे | Published: April 26, 2024 05:11 PM2024-04-26T17:11:51+5:302024-04-26T17:13:34+5:30
नागपूर : कोंढाळी मार्गावरील घटना
नागपूर : तिकिटाचे पैसे मागितले म्हणून एका प्रवाशाने चाकूने हल्ला करीत एसटीच्या कंडक्टरला जखमी केले. योगेश नामदेव काळे (वय ४०, रा. डोंगरगाव, ता. फुलमारी, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी कंडक्टरचे नाव आहे; तर फिरोज शेखनूर शेख (वय ३३, रा. कान्होलीबारा, ता. हिंगणा) असे आरोपी प्रवाशाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास नागपूर-कोंढाळी मार्गावरील रिंगणाबोडी गावानजीक ही धक्कादायक घटना घडली. यामुळे बसमधील प्रवाशांत काही काळासाठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर आगाराची हिरकणी एसटी बस ५१ प्रवाशांना घेऊन नागपूर येथून कोंढाळीमार्गे संभाजीनगरकडे जात होती. आरोपी फिरोज हा नागपूर येथून बसमध्ये बसला. नागपूर बसस्थानकावर बसमध्ये गोंधळ घालून माझी जागा रिझर्व्ह आहे, म्हणून त्याने महिला प्रवाशांना बसमधून खाली उतरविले होते. सदर बसच्या कंडक्टरने याकडे दुर्लक्ष केले. यानंतर बस नागपूर येथून कोंढाळीकडे निघाली. यानंतर कंडक्टर योगेश याने नागपूर-कोंढाळी प्रवास करणाऱ्या फिरोज शेख याच्याकडे तिकीट मागितले असता आपण ऑनलाइन तिकीट काढले आहे, असे त्याने सांगितले. यावर कंडक्टर योगेश याने ऑनलाइन तिकीट दाखवण्यास सांगितले असता फिरोजने योगेश याच्यासोबत वाद घातला. याच दरम्यान फिरोजने नागपूर-कोंढाळी मार्गावरील रिंगणाबोडी गावानजीक योगेश याची गच्ची पकडून डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. बसमधील काही प्रवाशांनी फिरोज याला पकडले. तसेच विनोद इंगोले (रा. अकोला) या प्रवाशाने तातडीने या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. यातच फिरोजने चाकू व मोबाइल चालत्या बसमधून बाहेर फेकला. बसचालक संतोष जाधव (वय ४७, रा. संभाजीनगर) याने कोंढाळी पोलिस ठाण्यात बस आणली. कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी जखमी बस कंडक्टर योगेश याला उपचारासाठी कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर योगेशला याला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपी फिरोजविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
कोण आहे फिरोज शेख?
फिरोज शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला गांजा व अमली पदार्थांचे व्यसन आहे. त्याने २०१९ मध्ये उमरेड येथून एका पोलिस कर्मचाऱ्यांची ऑनलाइन वाहन चालन करण्याचे मशिन चोरले होते; ते मशिनसुद्धा कोंढाळी पोलिसांना आरोपीच्या बॅगमध्ये मिळाले आहे.