बसचालकाने तरुणीला चिरडले
By admin | Published: February 27, 2016 03:13 AM2016-02-27T03:13:54+5:302016-02-27T03:13:54+5:30
मिहानमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या प्रेरणा गंगाधर काकडे (वय २४, रा. बोरगाव, सौंसर, जि. छिंदवाडा) या तरुणीला बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून चिरडले.
रहाटे कॉलनी चौकात अपघात : प्रचंड तणाव, ट्रॅफिक जाम
नागपूर : मिहानमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या प्रेरणा गंगाधर काकडे (वय २४, रा. बोरगाव, सौंसर, जि. छिंदवाडा) या तरुणीला बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून चिरडले. रहाटे चौकात शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता घडलेल्या या अपघातामुळे तणाव निर्माण झाला होता. सनदी लेखापाल (सीए) असलेली प्रेरणा नोकरीच्या निमित्ताने सीताबर्डीतील मूनलाईट फोटो स्टुडिओजवळ मैत्रिणींसह किरायाने राहत होती.
ती मिहानमधील एका कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होती. ती आपल्या कर्तव्यावर जाण्यासाठी अॅक्टीव्हाने (एमएच ३१/ ईएस ८२६०) निघाली. सिग्नल बंद असल्यामुळे ती रहाटे चौकात उभी होती. हवालदार अनिल गोविंद मरस्कोल्हे चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रित करीत होते.
त्यांनी इशारा करताच बस (एमएच ४०/ वाय ५२७३) चालकाने झटक्यात बस दामटली. त्यामुळे बसच्या बाजूला उभी असलेली प्रेरणा वाहकाच्या बाजूच्या चाकात येऊन गंभीर जखमी झाली. तिला अत्यवस्थ अवस्थेत बाजूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही वेळेतच तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
प्रेरणाच्या अपघाताची वार्ता कळताच तिचे नातेवाईक नागपुरात आले. रुग्णालयात पोहचल्यानंतर त्यांना प्रेरणाच्या मृत्यूची वार्ता कळली. ती ऐकताच तिच्या वृद्ध आईची शुद्ध हरपली तर, वडील अन् भावाचा एकच आक्रोश सुरू झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीची प्रेरणा अष्टपैलू होती. ती उत्तम खेळाडू आणि कुशल संघटक होती. निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, गुरुवारी तिला कंपनीत सुरू असलेल्या कार्यक्रमामुळे रुमवर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी नेहमीच्या तुलनेत ती उशिरा झोपून उठली अन् घाईगडबडीतच कंपनीत निघाली. उशीर झाल्यामुळे ती वेगळ्याच विचारात होती. त्याचमुळे सिग्नल सुरू झाल्याचे अन् बसचालकाने बस दामटल्याचे तिच्या लक्षात आले नाही आणि प्रेरणाचा घात झाला. आपल्या स्वभावशैलीमुळे परिवारासोबतच ती मित्र परिवारातही अनेकांची प्रेरणा होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसोबतच मित्र-मैत्रिणींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
हेल्मेट असते तर वाचली असती प्रेरणा
या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. चौकात असलेल्या अनेकांनी बसचालकाकडे धाव घेतली. मध्येच बस थांबवली गेल्याने वाहतूक रोखली गेली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी प्रेरणाची दुचाकी पोलीस व्हॅनमध्ये टाकली. बसही बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. विशेष म्हणजे, अपघाती मृत्यू झालेल्या प्रेरणाने हेल्मेट घातले नव्हते. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला. पोलीस हेल्मेटबाबत वारंवार सूचना, कारवाई करीत असूनही दुचाकीचालक लक्षात घ्यायला तयार नाही. त्यामुळे गेल्या ६ दिवसात ५ जणांचा बळी गेला आहे. हेल्मेट घालून सतर्कपणे वाहन चालविले असते तर प्रेरणा आणि अन्य जणाचे प्राण वाचले असते.