बसचालक, वाहकांच्या धोरणांचा प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:13+5:302021-03-27T04:09:13+5:30
मौदा : मौदा तालुक्याचे ठिकाण असून नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथे दोन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या फार जास्त ...
मौदा : मौदा तालुक्याचे ठिकाण असून नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथे दोन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या फार जास्त असते. येथे आशियाड व शिवशाही वगळता सर्व बसगाड्यांना थांबा आहे. हल्ली जनता बसगाड्या कमी केल्यामुळे जलद गाड्यांनी प्रवास करावा लागतो. परंतु चालक-वाहकाच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मौद्यात बस थांबत नाही असे सांगत वाहकांकडून प्रवाशांना बसखाली उतरविल्या जात आहे. असाच प्रकार बुधवारी नागपूर बसस्थानकावर घडला आहे. चंद्रपूर-भद्रावती-नागपूर वरून भंडारा, तिरोडा कडे जाणाऱ्या बस क्रमांक एम. एच. १४/बीटी ०८१२ या गाडीत सकाळी ९.४५ वाजता नागपूर बसस्थानकावरून मौदा येथे जाण्याकरिता ४ प्रवासी बसले होते. बसमध्ये जागा असूनही बस वाहकाने प्रवाशांशी अरेरावी करीत खाली उतरविले. मौदा शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे मौदा शहरातून नागरिकांचे आवागमन फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या या मार्गावरून साधारण बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मौदामार्गे जाणाऱ्या गाड्यांना मौद्या बसस्थानकावर थांबा देण्याच्या सूचना बस चालक आणि वाहकांना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.