नागपुरात बस ऑपरेटर्सना १५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:47 PM2020-01-06T20:47:59+5:302020-01-06T20:49:55+5:30
परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शहर बससेवा मिळावी म्हणून बस ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु बसची देखभाल होत नसल्याने नागरिकांचा चांगली सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी कर्मचाऱ्यांचे तीन गट निर्माण करून पहाटे ५ वाजताच्या सुमारास तीन बस डेपोत ३२६ बसची तपासणी केली असता, अस्वच्छता तसेच काही बसेस नादुरुस्त आढळून आल्याने तीन बस ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाख असा १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील मे. हंसा सिटी बस डेपोतील ११५ बसची पथकाने तपासणी केली. यात तीन बसेसमध्ये मोठ्या स्वरूपाचे तांत्रिक दोष आढळून आले. या बस डेपोतून न सोडता उर्वरित ११२ बसेस सकाळी १० च्या सुमारास डेपोतून सोडण्यात आल्या. पटवर्धन मैदानातील मे. आर. सिटी. बस डेपोतील ११६ बसेसची तपासणी केली असता, ९ बसेस नादुरूस्त आढळून आल्या. त्यामुळे १०७ बसेस डेपोतून सोडण्यात आल्या. तसेच खापरी येथील मे. ट्रॅव्हल्स टाइम्स बस डेपोतील ७८ बसेसची तपासणी केली असता एक बस नादुरुस्त आढळून आली.
आकस्मिक तपासणीत अनेक बसेस नादुरुस्त आढळून आल्या. करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात ऑपरेटरवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी डिम्टस्ची आहे. असे असूनही संबंधित बस ऑपरटेरवर कारवाई होत नसेल तर डिम्टस् कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सभापतींनी दिली होती. अनियिमतता असूनही आजवर दंडात्मक कारवाई न केल्याने सभापतींनी ऑरेंज सिटी स्ट्रीट, पटवर्धन डेपो व खापरी डेपो ऑपरेटरला प्रत्येकी ५ लाखांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. तसेच बस ऑपरेटरवर कारवाई न केल्याने डिम्टस् कंपनीवर २ लाखांचा दंड आकारण्याचे निर्देश बाल्या बोरकर यांनी परिवहन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.