नागपूर जिल्ह्यातल्या डेगमा गावात पाच वर्षांनी बससेवा पुन्हा सुरू; ग्रामस्थांचा आनंदोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:43 AM2018-01-01T10:43:12+5:302018-01-01T10:43:29+5:30
पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.
आॅनलाईन लोकमत
नागपूर: गावात येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे गावातून बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत. ही बाब लक्षात घेता बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. अखेर पाच वर्षांनंतर गावात एसटी बस पोहोचली अन् ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हे वास्तव आहे हिंगणा तालुक्यातील डेगमा (बु.) या गावातील.
डेगमा येथे साधारणत: पाच वर्षांपूर्वीपर्यंत एसटी महामंडळाची बस येत होती. मात्र प्रवासी पुरेसे मिळत नसल्याने तोट्यात असलेली बसफेरी एसटी महामंडळाने बंद केली. परिणामी एसटी बसफेरी बंद होताच विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खासगी वाहनांचा आधारही घेतला जात.
दुसरीकडे एसटी बसफेरी बंद होताच या भागात अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना बऱ्याचदा कितीतरी वेळ बसून राहावे लागत अन्यथा पायीवारी करावी लागत.
ही अडचण लक्षात घेता नागरिकांनी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्या मागणीबाबत जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार केला.
त्या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर सोमवार (दि. ३०)पासून बसफेरी सुरू करण्यात आली. गावात सोमवारी बसफेरी पोहोचताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० व सायंकाळी ५ वाजता अशा दोन बसफेऱ्या डेगमासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
डेगमा मार्गावर कोकर्डी, माथनी ही गावे असून बसफेरी सुरू झाल्याने डेगमासोबतच या दोन्ही गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक बसफेरीसाठी आवश्यक अशी प्रवासीसंख्या मिळून बसफेरी नियमित सुरू राहील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
तर बसफेरी सुरू राहील!
डेगमा येथील बसफेरी कमी प्रवासीसंख्येमुळे बंद करण्यात आली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता पुन्हा दोन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. या बसफेरीला पुरेसे प्रवासी मिळाले तर बसफेरी कायम सुरू राहील.
- सुधीर पंचभाई,
विभागीय नियंत्रक,
राज्य परिवहन महामंडळ