अमरावतीला जाणाऱ्या बसेस प्रवाशांना सोडतात बायपासवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:23 AM2021-02-24T11:23:12+5:302021-02-24T11:25:13+5:30
Nagpur News अमरावतीमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झालेल्या लॉकडाऊननंतर अमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस नागपुरात प्रवेश करीत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावतीमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झालेल्या लॉकडाऊननंतर अमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस नागपुरात प्रवेश करीत नाहीत. तर नागपूर डेपोच्या बसेस अमरावती बायपासवर जाऊन प्रवाशांना सोडत आहेत.
या सोबतच, अकोला डेपोतून येणाऱ्या बसेसची संख्याही कमी झाली आहे. या पूर्वी नागपुरातील सर्व बसस्थानकांमिळून अमरावतीसाठी दर १५ मिनिटांनी बसेस उपलब्ध होत्या. एकट्या गणेशपेठ डेपोमधून अमरावतीसाठी २० फेऱ्या सोडल्या जायच्या. आता ही संख्या ६ ते ७ फेऱ्यांवर आली आहे. कोविड संक्रमणाचा परिणाम कमी दिसायला लागताच एसटी डेपोमध्ये बसेस सॅनिटाईज करण्याची प्रक्रियाही मंदावली होती. मात्र आता पुन्हा उद्रेक वाढत असल्याचे दिसताच डेपोच्या गेटवरच कर्मचारी रिकाम्या बसेस सॅनिटाईज करत आहेत.
या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित होताच बसस्थानकावर प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यावर भर दिला जात आहे. तसेच मास्क लावूनच प्रवास होतो की नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. सतर्कता व सावधगिरी पाळूनच प्रवासी संक्रमणापासून वाचू शकतात. यामुळे बसच वाहकही यावर भर देत आहेत.