अनलॉकनंतर बसेस सुसाट; पाय ठेवायलाही मिळेना जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 12:18 PM2021-08-09T12:18:13+5:302021-08-09T12:18:36+5:30
Nagpur News नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून अमरावती आणि भंडाऱ्याला जाणाऱ्या बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे.
नागपूर : अनलॉकनंतर एसटी बसेस रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रवाशांची संख्याही वाढल्यामुळे बसस्थानकावर गर्दी होत आहे. नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून अमरावती आणि भंडाऱ्याला जाणाऱ्या बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे.
केवळ १३ बसेसच आगारात
-कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. परंतु त्यानंतर शासनाने काही निर्बंध शिथिल केल्यामुळे काही बसेस सुरू झाल्या. सध्या अनलॉकमध्ये बहुतांश बसेस रस्त्यावर धावत आहेत. नागपूरच्या गणेशपेठ आगारातील ७८ पैकी ६५ बसेस रस्त्यावर धावत असून, केवळ १३ बसेसच आगारात आहेत. या १३ बसेसही लवकरच रस्त्यावर धावतील, असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सर्वाधिक गर्दी अमरावती, भंडारासाठी
- सध्या नागपूरमधून अमरावतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी असल्यामुळे अमरावतीच्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. अमरावतीची बस प्लॅटफार्मवर लागली की लगेच बस फुल्ल होते. त्याचप्रमाणे भंडारा येथे जाणाऱ्या बसेसलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर यवतमाळकडे जाणाऱ्या बसेसमध्येही प्रवाशांची गर्दी होत आहे.
कोरोना गेल्यामुळे मास्क वापरत नाही
‘कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे आता मास्क वापरायची गरज नाही, असे मला वाटते. त्यामुळे मास्क वापरत नाही.’
-हिरामण वानखेडे, प्रवासी
केवळ गर्दीतच वापरतो मास्क
‘खूप गर्दी असली की मास्क वापरतो. सध्या बसस्थानकाच्या प्लॅटफार्मवर बसून असल्यामुळे मास्क काढून ठेवला आहे. बसमध्ये बसल्यानंतर मास्क घालीन.’
-राहुल बारसागडे, प्रवासी
............