बिल्डरच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यात असंतोष
By admin | Published: August 30, 2015 02:54 AM2015-08-30T02:54:20+5:302015-08-30T02:54:20+5:30
सीताबर्डीतील रोड वायडनिंग अॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामस्थळी बिल्डरने (विकासक)
मारहाण, तोडफोड सीताबर्डीत तणावपूर्ण स्थिती कोणत्याही क्षणी भडका उडण्याची भीती
नागपूर : सीताबर्डीतील रोड वायडनिंग अॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामस्थळी बिल्डरने (विकासक) घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व्यापारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी हाणामारी आणि दगडफेकीचीही घटना घडली. लगेच हा वाद निकाली न काढला गेल्यास येथे कोणतीही मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीताबर्डीतील नागपूर सुधार प्रन्यासच्या अभ्यंकर मार्गावरील वायडनिंग अॅन्ड बुटी महल स्ट्रीट स्कीम अंतर्गत १ लाख, १४ हजार, ७९. ३६ चौरस फूट पुनर्गठित भूखंड बुटी कुटुंबीयांना मिळाला आहे. या जागेची लीज बुटी कुटुंबीयांनी गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना पंजिकृत करून दिली आहे. तेथे गोयल गंगातर्फे बिल्डर आणि त्यांच्या साथीदारांनी खोदकाम, तोडफोड आणि बांधकाम हाती घेतले आहे. दुसरीकडे ५० ते ९० वर्षांपासून या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. या बांधकामामुळे आपली मोक्याची जागा जाईल. चांगला व्यवसाय बुडेल आणि होत्याचे नव्हते होईल, अशी भीती व्यापाऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे आपल्या जागेची निश्चिती व्हावी, आपल्याला आधी व्यवस्थित जागा मिळावी आणि नंतरच विकासकाने काम करावे, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पाठिंबाच आहे. मात्र, हा विकास करताना कोणत्याही व्यापाऱ्याच्या रोजीरोटीवर गदा येऊ नये, कुणाचा व्यवसाय उद्ध्वस्त केला जाऊ नये, अशी भूमिका घेऊन व्यापारी आपली मागणी रेटत आहे. विकासकाकडून त्याला दाद मिळत नसल्यामुळे व्यापारी वर्गात रोष आहे. नासुप्र, महापालिकेकडूनही साथ मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पोलीस ठाणे आणि कोर्टातून न्याय मिळवण्याचे व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)
‘जैसे थे‘चे आदेश
या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेऊन कोर्टाकडून ‘जैसे थे‘चे आदेश मिळवले आहे. मात्र, ते दुर्लक्षित करून बिल्डर बाउन्सर आणि गुंडांना उभे करून व्यापाऱ्यांची दुकाने फोडत करीत आहे. शुक्रवारी दुपारी असाच प्रकार झाला. तोडफोड होत असल्याचे पाहून व्यापारी विमलकुमार जैन यांनी बिल्डर अनुप खंडेलवाल आणि त्यांच्या साथीदारांना रोखण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण करून दुकान तोडण्याची तसेच बरबाद करण्याची धमकी दिल्याची तक्रार जैन यांनी सीताबर्डी ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले.
व्यवसाय कसा वाचवायचा
दरम्यान, बिल्डर खंडेलवाल यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र रोष निर्माण झाला असून, कशा पद्धतीने आपले दुकान आणि व्यवसाय वाचवायचा, या प्रश्नाने सीताबर्डीतील अनेक व्यापारी चिंताग्रस्त आहे. कायदेशीर मार्ग अवलंबूनही बिल्डर अथवा प्रशासनाकडून दाद मिळत नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या रोषाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.