ओबीसी तरुणांसाठी व्यापार मंच
By admin | Published: April 24, 2017 01:50 AM2017-04-24T01:50:25+5:302017-04-24T01:50:25+5:30
नोकरी मागणारे नव्हे, तर दुसऱ्यांना नोकरी देणारे बना, असे तरुणांना आवाहन करीत,...
केजेफोसीआचा पुढाकार : राज्यात २०० सदस्यांची नोंदणी
नागपूर : नोकरी मागणारे नव्हे, तर दुसऱ्यांना नोकरी देणारे बना, असे तरुणांना आवाहन करीत, देशभरात व्यापारासाठी सशक्त नेटवर्क उभे करण्याच्या हेतूने काळी समाज बांधवांनी क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले फोरम आॅफ सोशियो कमर्शियल अॅण्ड इंडस्ट्रीयल अॅक्टिव्हिटी, (केजेफोसीआ) या फोरमची मुहूर्तमेढ रोवली आहे. सध्या ओबीसी समाजातील सुशिक्षित तरुण हा नोकरीच्या शोधात दारोदारी भटकत आहे. अशा या तरुणांना व्यापार विषयक मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी हा व्यापार मंच उभा करण्यात आला असल्याचे फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ‘लोकमत’ व्यासपीठच्या मंचावर चर्चा करताना सांगितले.
या चर्चेत फोरमच्या राष्ट्रीय प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, सचिव रवींद्र अंबाडकर, अॅड़ मिलिंद भोंगाडे, विनीत गणोरकर, प्रकाश बोबडे, नंदू कन्हेरे, लक्ष्मी बुजाडे, सुरेंद्र अंबाडकर, नाना लोखंडे, संजय बोबडे व राहुल पलाडे यांनी भाग घेतला होता. क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले फोरम आॅफ सोशियो कमर्शियल अॅण्ड इंडस्ट्रीयल अॅक्टिव्हिटी, या फोरमची मागील आठ महिन्यांपूर्वी अधिकृत नोंदणी करण्यात आली. यानंतर अल्पवधीत राज्यभरात दोनशेवर सदस्य नोंदणी झाली. फोरमच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक जडणघडणीत माळी समाजाचे फार मोठे योगदान राहिले आहे. ज्यावेळी समाजात शेतीला सर्वोच्च स्थान होते, आणि त्यानंतर व्यवसायाला मध्यम व नोकरीला कनिष्ठ मानले जात होते, त्याकाळी सुद्धा माळी समाज हा राज्याच्या आर्थिक जडणघडीणत सहभागी होता.
एका सामान्य विक्रेत्यापासून तर वितरक, उत्पादक, आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, फायबर इंडस्ट्रीज, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सरकारी कंत्राटदार, मेटल इंडस्ट्रीज, हाऊसिंग डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज, पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज, प्रिटिंग इंडस्ट्रीज, पब्लिकेशन इंडस्ट्रीज, वस्त्रोद्योग, शिक्षण संस्था व सहकारी संस्था अशा विविध क्षेत्रात माळी समाजातील उद्योजक आहेत. परंतु आता काळ बदलला आहे. अनेक परिवर्तने घडत आहेत. स्पर्धा वाढत आहेत. आणि या वाढत्या स्पर्धेत टिकून व्यावसायिक प्रगती करायची असेल, तर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. म्हणूनच या फोरमने ही संकल्पना पुढे आणली असल्याचे यावेळी फोरमचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मागेल त्याला ‘मदत’
हा फोरम माळी समाज बांधवांनी एकत्रित येऊन उभा केला असला, तरी यात ओबीसी समाजातील मागेल त्याला ‘मदत’ दिली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून गावागावात तरुणांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत. त्यात तरुणांनी नवीन उद्योगाची निवड कशी करावी, यानंतर उद्योग कसा सुरू करावा, आणि त्यानंतर उत्पादित मालाची कुठे व कशी विक्री करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे. यानुसार आतापर्यंत फोरमतर्फे चार शिबिरे घेण्यात आली असून, पुढेही अशा शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती फोरमचे सचिव रवींद्र अंबाडकर यांनी दिली.
देशभरात व्यापारी नेटवर्क उभारणार
या फोरमच्या माध्यमातून देशभरात व्यापाराचे एक नेटवर्क तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यासाठी फोरमतर्फे एक स्वतंत्र वेबसाईट तयार करून त्याव्दारे व्यापार विषयक माहितीची देवाणघेवाण केली जात आहे. शिवाय मोठे व्यापारी आणि लहान व्यापाऱ्यांना एक दुसऱ्यांशी जोडण्याचे काम केले जात आहे. एवढेच नव्हे, तर त्यावर नवीन उद्योजकांसाठी शासनाच्या विविध योजनांचीही माहिती दिली जाते. फोरमच्या या उपक्रमाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
असा आहे, फोरम :
फोरमच्या राष्ट्रीय प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, सचिव रवींद्र अंबाडकर, संचालक शंकरराव बोरकर, संचालक राजेंद्र गिरमे, संचालक अनिल जाधव, अरुण पवार, राजीव जाधव, प्रदीप राऊत, अनिल ओंकार, सागर खलोकोर, विश्वास महादुले, शंकरराव नेवसे, ज्ञानेश्वर लोखंडे, नंदू कन्हेरे, संजय बोबडे, सुरेंद्र अंबाडकर, प्रकाश बोबडे व लक्ष्मी बुजाडे यांचा समावेश आहे.
असे आहेत, फोरमचे उद्देश :
माळी समाजातील विक्रेते, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, नोकरदार, नवउद्योजक व बेरोजगार या सर्वांना एक दुसऱ्यांशी जोडून सामूहिकरीत्या आर्थिक प्रगती साध्य करणे.
फोरमचे सदस्य असलेल्या व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार व बेरोजगार यांना फोरमच्या माध्यमातून सरकारी कामे मिळवून देण्यासाठी मध्यस्थ या नात्याने काम करणे.
शेतकऱ्यांना एकत्र करू न क्रॉप कल्चरच्या माध्यमातून शेत मालावर आधारित प्रक्रिया केंद्र सुरू करण्याकरिता मध्यस्थ या नात्याने काम करणे.
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाचा पुरवठा सरकारी योजनामध्ये व्हावा, याकरिता मध्यस्थ म्हणून भूमिका वठविणे.
समाजातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षित करून उद्योजक आणि समाजाची व्यापारपेठ यातील दुवा म्हणून काम करणे.
सरकारच्या औद्योगिक धोरणामध्ये समाजहिताचा विचार व्हावा याकरिता समाजातील उद्योजक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणे.
या सर्व व्यवहारातून तसेच कंपनीमध्ये जमा झालेल्या भांडवलातून जो नफा कंपनीला मिळेल, त्यातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणे.