लॉकडाऊनमुळे बुडाला शालेय वस्तू विक्रीचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:52+5:302021-08-14T04:12:52+5:30
खापा : जून व जुलै महिना लागताच शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होते. मात्र यंदा ऑगस्ट महिना लागला ...
खापा : जून व जुलै महिना लागताच शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होते. मात्र यंदा ऑगस्ट महिना लागला असला तरी शालेय साहित्य विक्रीच्या दुकानांत शुकशुकाट आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. यंदा ग्रामीण भागात काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोविडमुळे अनेक पालकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे बाजारात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी नाही. केवळ दहावी व बारावीला असलेले विद्यार्थी शैक्षणिक साहित्याची खरेदी करीत आहेत. लॉकडाऊनचा फटका खापा शहरातील विक्रेत्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. खापा शहरामध्ये शालेय साहित्य विक्रीची १४ ते १५ दुकाने आहेत. या वर्षी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वच व्यवसाय ठप्प झाले. याशिवाय शहरी भागात ऑनलाइन अध्यापन सुरू असल्याने व आठवीपर्यंतच्या शाळा कधी सुरू होतील, याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने बाजारातील मंदी कायम राहील, असे शालेय साहित्य विक्रेत्यांचे मत आहे.
अनेकांनी बदलला व्यवसाय
शालेय साहित्याची विक्री होणार नसल्याची शाश्वती आल्याने अनेक विक्रेत्यांनी गतवर्षीपासून व्यवसाय बदलला आहे. काहींनी दुकानात सॅनिटाझर आणि मास्क विक्रीला सुरुवात केली आहे. याशिवाय काही विक्रेत्यांनी जनरल स्टोर्स सुरू केले आहेत.
गत दोन वर्षांत शालेय वस्तूंची विक्री कमी झाली. लाखोंची होणारी उलाढाल थांबल्यामुळे व्यवसाय बुडाला.
- सुधीर नाचनकर, खापा, शालेय वस्तू विक्रेता
दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये शालेय वस्तूच्या खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी दुकानात गर्दी व्हायची. शाळा बंद असल्याने व्यवसाय बुडाला.
- अनिल बोकडे, खापा, शालेय वस्तू विक्रेता