कळमन्यात १०० कोटींचा व्यवसाय ठप्प! मतमोजणीसाठी ३, ४, ५ जूनला सात बाजारपेठा बंद
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 30, 2024 08:48 PM2024-05-30T20:48:05+5:302024-05-30T20:48:42+5:30
फळे व भाजीपाला बाजारात सर्वाधिक नुकसान
नागपूर : कळमन्यातील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमध्ये मतमोजणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उभारण्यात आलेल्या सुरक्षात्मक उपायांमुळे नाशवंत वस्तू भाजीपाला, फळे, लाल मिरची तसेच धान्य आणि आलू-कांदे बाजारातील जवळपास १०० कोटींचे व्यवहार तीन दिवस ठप्प राहणार आहे. सर्वाधिक फटका फळे आणि भाजीपाला बाजाराला बसणार असल्याची प्रतिक्रिया विविध बाजारातील व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नागपुरात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान झाले आणि व्होटिंग मशीन्स कळमना बाजार समिती यार्डात आल्यापासून फळे आणि धान्य बाजारातील व्यापाऱ्यांना सुरक्षेचा त्रास सुरू झाला. कळमना मार्केट यार्डातील लिलाव हॉल क्रमांक-३ मध्ये नागपूर आणि क्रमांक-४ मध्ये रामटेक मतदार संघाची मतमोजणी आणि लिलाव हॉल क्रमांक-५ मध्ये भोजन व्यवस्था करण्यात आल्याने या तिन्ही हॉलच्या आजूबाजूची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
फळांचा लिलाव आणि विक्रीला त्रास
एप्रिल, मे आणि जून महिन्यात आंब्याचा सिझन असल्यामुळे फळांचे ट्रक बाजारात आणण्यास त्रास होऊ लागला. १ व २ मे रोजी व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन ५ मेपर्यंत जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे लिलावाची व्यवस्था करण्यासाठी बाजारात रस्त्यावरच ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ताडपत्री फाटली. त्यानंतर फळे व्यापाऱ्यांनी हॉल क्रमांक-४ मध्ये तळ ठोकून आंब्यासह अन्य फळांची विक्री सुरू केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यापाऱ्यांना २० मेपर्यंत वाढीव मुदत दिली. तेव्हापासूनच व्यापाऱ्यांचे दरदिवशी १ कोटींचे नुकसान होत आहे. आता रविवार २ जून दुपारपासून ५ जूनपर्यंत सर्व बाजारपेठा बंद राहणार असल्याने जवळपास १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय ठप्प राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
स्थायी मतमोजणी केंद्र शहराबाहेर उभारावे
"लिलावाच्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे बाजारात माल आणणाऱ्या १५० हून अधिक शेतकऱ्यांना दररोज एक कोटींचा फटका बसत आहे. फळांचा योग्य लिलाव होत नाही आणि किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी येत नाहीत. निवडणुकीची मतमोजणी अन्यत्र करण्याची बाजार समितीतील विविध असोसिएशनची गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी आहे. मात्र, मागणीकडे नेहमीच कानाडोळा करण्यात येतो. सरकारने शहराबाहेर १० एकरात स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्र स्थायी स्वरूपात उभारावे. त्याचा फायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होईल. शिवाय, वेअरहाऊस बांधून सरकारला उत्पन्नही मिळू शकेल. पुढील काळात सरकारने कळमन्यात मतमोजणी घेऊ नये," अशी मागणी कळमना फळे बाजार असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी केली.
नुकसान होणारच
"मतमोजणी काळात कळमना बाजार समितीच्या यार्डात भाजीपाल्यांची आवक ३, ४ आणि ५ जून रोजी बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. पण भाजी बाजार यार्डात दुसऱ्या भागात असल्याने ३ रोजी दुपारपर्यंत भाजीपाल्याची विल्हेवाट लावायची आहे. या तीन दिवसात अन्य जिल्हे वा राज्यातून भाज्यांची आवक होणार नाही. त्यामुळे नुकसान होईलच. सरकारच्या नियमांचे पालन करू," असे कळमना भाजीपाला मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भैसे यांनी म्हटलं आहे.