सट्टेबाजीत व्यापाऱ्याची कोंडी !

By admin | Published: September 22, 2016 02:50 AM2016-09-22T02:50:56+5:302016-09-22T02:50:56+5:30

क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी चादर व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली.

Businessman betting deal! | सट्टेबाजीत व्यापाऱ्याची कोंडी !

सट्टेबाजीत व्यापाऱ्याची कोंडी !

Next

त्रस्त होऊन घेतले विष वसुलीसाठी अपहरणही चार आरोपींना अटक
नागपूर : क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीसाठी चादर व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीने दुखावलेल्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १७ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार दोन दिवसांनंतरही दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापारीही हादरले आहेत. लकडगंज पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यात महेश अग्रवाल, नीरज खंडेलवाल, हरीश कोठारी आणि मितेश ठक्कर सहभागी आहे.
सूर्यनगर कळमना येथील ३८ वर्षीय बंटी रामदत्त अग्रवाल यांचे गांधीबागेत किराणा दुकान आहे. ते १७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता दुकान बंद करून घरी जात होते. त्याचवेळी बंटीला महेश अग्रवालने फोन करून नेहरू पुतळा चौकात भेटायला बोलावले. महेश फायनान्सचे काम करतो.
त्याचे जागनाथ बुधवारी येथे कार्यालय आहे. तो ओळखीचाच असल्याने बंटी नेहरू पुतळा चौकात पोहोचला. तिथे महेशसोबत इतरही दोन आरोपी होते. ते बंटीला घेऊन नीरज खंडेलवालच्या कार्यालयात गेले. तिथे त्याला क्रिकेट सट्ट्यातील थकीत रुपये परत मागितले.कार्यालयातच त्याला बंद करून बेदम मारहाण केली. रुपये परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तीन तास मारहाण केल्यानंतर आरोपींनी बंटीला त्याच्या सूर्यनगर येथील घराजवळ सोडले.
बंटी घरी परत न आल्याने कुटुंबीय अगोदरच चिंतेत होते. घाबरलेला बंटी घरी आल्यावर रडू लागला. त्याची आपबिती ऐकल्यावर घरच्यांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. सकाळी उठल्यावर या विषयावर बोलू असेही सांगितले. सकाळी घरच्यांना बंटी कुठेही आढळून आला नाही. खूप शोधाशोध केली तरीही तो कुठेही आढळला नाही.
त्यामुळे १८ सप्टेंबर रोजी कुटुंबीय कळमना पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांना लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे त्यांना अगोदर कळमना पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. या धावपळीदरम्यानच १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता एका ओळखीच्या व्यक्तीला बंटी गांधीबाग येथील दुकानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबीयांनी लगेच घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
महेशच्या कुटुंबीयांनी १९ सप्टेंबर रोजी लकडगंज पोलीस, पोलीस आयुक्त कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या आधारावर २० सप्टेंबर रोजी लकडगंज पोलिसांनी अपहरण, मारहाण, धमकावणे आदीचा गुन्हा दाखल केला. आरोपींच्या अटकेची माहिती होताच बुधवारी सकाळीच लकडगंज पोलीस ठाण्यात गर्दी झाली. पोलिसांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वादाचे मुख्य कारण हरीश कोठारी असल्याचे सांगितले जाते. बंटीने क्रिकेट सट्टेबाजीमध्ये ५० लाख रुपयापेक्षा अधिक रुपये हारले होते. बुकीने हरीशला त्याच्या वसुलीचे काम सोपविले होते.
हरीशने महेश अग्रवाल, नीरज खंडेलवाल आणि मितेश ठक्करच्या मदतीने बंटीला धडा शिकवण्याची योजना आखली. त्याने यापूर्वीसुद्धा गुन्हेगारांच्या मदतीने अनेक लोकांकडून वसुली केली होती. त्यामुळे बंटीसुद्धा रुपये परत करेल याचा त्याला विश्वास होता. परंतु ही रक्कम परत करणे बंटीच्या आवाक्यात नव्हते. आरोपींच्या दहशतीमुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

यापूर्वीही घडल्या अशा घटना
वसुलीसाठी गुन्हेगारांचा वापर करण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. दहा महिन्यांपूर्वी सीताबर्डी येथील माजी रणजी खेळाडूच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. पीडिताने आपसात प्रकरण मिटविले. या प्रकरणातील सहभागी आरोपींच्या विरुद्ध महिनाभरापूर्वीच सट्टेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डब्बा प्रकरणाशी तार
या प्रकरणातील आरोपीचे तार डब्बा प्रकरणाशी सुद्धा जुळलेले आहेत. शहर पोलीस डब्बा प्रकरणाचा तपास करीत आहे. ही चौकशी सुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे. यादरम्यान आरोपींनी व्यापाऱ्याचे अपहरण करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाले आहे. डब्बा प्रकरणातील आरोपी दिनेश गोखलानी याचा सुद्धा एका महिन्यापूर्वी हुडकेश्वर येथे संशयास्पद मृत्यू झाला. ती आत्महत्या असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Businessman betting deal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.