सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: September 14, 2022 05:22 PM2022-09-14T17:22:17+5:302022-09-14T17:23:51+5:30
व्यावसायिकाला चौघांनी बनविले ‘टार्गेट’ : प्रत्यक्ष न भेटता फोनवरील संवादातून ठेवलेल्या विश्वासाचा फटका
नागपूर : सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली चार जणांनी नागपुरातील एका व्यावसायिकाला ४९ लाख ९४ हजारांचा गंडा घातला. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित व्यावसायिकाने एकदाही त्यांची भेट घेतली नव्हती व केवळ फोनवरील संवादाच्या आधारावर पैशांचा व्यवहार सुरू होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी प्रवीणकुमार बन्सल, त्रिलोक त्रिपाठी, निलेश रॉय, निशांत कुकरेजा या आरोपींविरोधात फसवणूकीचा तसेच आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ए. विनू प्रकाश (४४) असे व्यावसायिकाचे नाव असून त्यांची एमआयडीसीत ए.पी.इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यांना पैशांची गुंतवणूक करायची होती व ऑनलाईन सर्च करता करता त्यांना ‘द मार्कट्रेड्स’ या संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बन्सलचा फोन आला. त्याने प्रकाश यांना सिंगापूर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला व भरपूर नफा होईल, असे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रकाश यांनी १९ ऑगस्ट रोजी दीड लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नियमितपणे ते ‘द मार्कट्रेड्स’च्या खात्यावर पैसे पाठवत होते.
दरम्यान बन्सलचा साथीदार त्रिपाठीनेदेखील त्यांना फोन केला व त्याच्या सांगण्यावर प्रकाश यांनी ४ लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर केले. २२ ऑगस्ट रोजी प्रकाश यांना २१ हजार रुपयांची रक्कम डिव्हीडेंट म्हणून मिळाली. यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढला व त्यानंतर त्यांनी वेळोवेळी एकूण ४९ लाख ९४ हजार रुपये ट्रान्सफर केले.
सर्व रक्कम नफ्यासह एकत्रितपणे ३० ऑगस्ट रोजी परत मिळेल असे आश्वासन आरोपींनी दिले होते. मात्र असे न झाल्याने प्रकाश यांनी रॉयला संपर्क केला. त्याने कंपनीचा एमडी म्हणून कुकरेजाशी बोलणे करवून दिले. कुकरेजा यांनी आणखी ११ लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र यावेळी विनू प्रकाश यांनी त्यांना त्यांचा पत्ता विचारला व प्रत्यक्ष भेटून पैसे देण्याची तयारी दाखविली. यावर कुकरेजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे प्रकाश यांना संशय आला व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.