नागपुरात १ कोटीच्या खंडणीसाठी लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:42 AM2017-11-22T00:42:27+5:302017-11-22T00:47:43+5:30
विदर्भाच्या लॉटरी व्यावसायिकांमधील बडी असामी समजल्या जाणाऱ्या सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल यांचे मंगळवारी सकाळी सशस्त्र आरोपींनी अपहरण केले.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : विदर्भाच्या लॉटरी व्यावसायिकांमधील बडी असामी समजल्या जाणाऱ्या सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल यांचे मंगळवारी सकाळी सशस्त्र आरोपींनी अपहरण केले. त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्यामुळे संबंधित वर्तुळात आणि शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे. जैन समाजातील प्रतिष्ठित परिवार म्हणून आग्रेकर कुटुंबीयांचा मान आहे. नागपूर-विदर्भातील लॉटरी व्यावसायिकांमध्ये त्यांचे नाव सर्वात मोठे आहे. राहुलला जयेश नामक मोठा भाऊ आहे. एक-दीड तासात परत येतो, असे सांगून आज सकाळी राहुल घराबाहेर गेला. काही अंतर पायी चालत गेल्यानंतर राहुल एका बोलेरोसारख्या वाहनात बसल्याचे सांगितले जाते. दुपार झाली तरी राहुल परत आला नाही म्हणून कुटंबातील अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे सांगितले. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. यासंबंधाने कुणाकडे वाच्यता केल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही मोबाईलवर बोलणाऱ्याने दिली. एक कोटींच्या खंडणीसाठी राहुलचे अपहरण झाल्याचे कळाल्याने आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्याने घरच्यांचा आक्रोश सुरू झाला. परिवाराशी संबंधित खास आप्तांना बोलवून अपहरण आणि खंडणीच्या फोनची माहिती देण्यात आली. प्रदीर्घ विचारमंथन केल्यानंतर पोलिसांकडे माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लकडगंज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला.