छापील किमतीने खरेदी करा पाण्याची बाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:42 PM2018-11-15T23:42:55+5:302018-11-15T23:44:00+5:30
बाटलीबंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील बाटलीवर जी छापील किंमत आहे तेवढेच पैसे द्यावे, असे आवाहनदेखील वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाटलीबंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील बाटलीवर जी छापील किंमत आहे तेवढेच पैसे द्यावे, असे आवाहनदेखील वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
अतिरिक्त शुल्काद्वारे ग्राहकांची लूट
थंड पाण्याची बॉटल खरेदी करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही ठिकाणी आजाराच्या दृष्टीने पाणी खरेदी करावे लागते. थंड पाण्याचा वापर वाढला आहे. याचा गैरफायदा घेत दुकानदार १५ ते २० रुपयांच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीवर कुलिंग चार्ज म्हणून दोन ते चार रुपयांपर्यंत अतिरिक्त घेत ग्राहकांची लूट करीत आहेत. ग्रामीण भागात तर रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याने ही बाटली २० रुपयांपर्यंत जाते. वैधमापन विभागाकडून केवळ दुधाच्या पिशव्यांवर कारवाई होत होती. मात्र, राज्याचे वैधमापनशास्त्र विभागाने यासंबंधीचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैधमापनशास्त्र विभाग आता पाणी विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. शहरात दररोज विविध भागात सुमारे लिटरच्या २० हजारांपेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याची विक्री होते. दुकानदाराने एका बाटलीमागे दोन रुपये जरी अतिरिक्त घेतले तरी दिवसाला ४० हजार रुपये विक्रेते ग्राहकांच्या खिशातून काढत आहे.
ग्राहकांनी तक्रारींसाठी पुढे यावे
वितरकाकडून विक्रेत्याला नफा होईल, या हिशेबानेच घाऊक दरात बाटल्या दिल्या जातात. मात्र, अधिक नफा मिळवण्यासाठी दुकानदार कूलिंग चार्ज आकारतात. त्यामुळे ग्राहकांकडून अधिक पैसे घेणे थांबले नाही तर भविष्यात वितरकांनाही आरोपी करण्याचा इशारा वैधमापनशास्त्र विभागाने दिला आहे. यासाठी पाण्याच्या बाटलीसाठी अतिरिक्त पैसे घेणाऱ्या दुकानदाराविरुद्ध ग्राहकांनी तक्रार नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे.
व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करणार
तक्रारींच्या आधारे आणि नियमित तपासणी करताना बाटलीबंद पाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. अधिक पैसे घेणाºया व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ग्राहकांनीही यासाठी पुढे येऊन तक्रारीद्वारे या प्रकाराची माहिती द्यावी.
हरिदास बोकडे, सहायक नियंत्रक,
वैधमापनशास्त्र नागपूर विभाग.
शीतपेय जास्त दरात विकणे गुन्हाच
जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करून एक लिटरच्या शीतपेयाच्या बाटलीसाठी ४० हून अधिक रुपये ग्राहकांना मोजायला लावतात. त्यातही किरकोळ विक्रेते यावरही अधिक शुल्क आकारतात. शीतपेय ही आरोग्यासाठी आवश्यक असलेली वस्तू नसली तरी बेकायदेशीरपणे अधिक रक्कम वसूल करणे हा गुन्हा ठरतो. दूध व बाटलीबंद पाणी यानंतर शीतपेय जादा दराने विकणाऱ्या विक्रेत्यांकडे कारवाईचा मोर्चा वळवण्यात येणार आहे. बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या, वितरक व किरकोळ विक्रेते यांना छापील किमतीपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांकडून घेता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
वैधमापन विभाग अशी करते कारवाई
एखादी वस्तू जर पॅकेट्समध्ये बंद असेल तर त्या पॅकेटवर उत्पादकाचे व आयातदाराचे नाव, त्यातील घटक, एकूण वजन, एमआरपी, पॅकिंगची तारीख, कस्टमर केयरचा नंबर, एक्सपायरी डेट या सहा गोष्टी नमूद असणे आवश्यक असते. बाजारात मिळणाऱ्याआयातीत वस्तुंवरदेखील त्यांच्या आयातदाराचे तसेच त्याची पॅकिंग करणाऱ्यांची (इम्पोर्ट व पॅकर) नावे व पत्ते असणे आवश्यक असते. त्यापैकी एखादीही माहिती वस्तूवर नमूद नसेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. पॅकेज कमोडिटी कायदा-२०११ मधील तरतुदीनुसार कोणत्याही पॅकबंद वस्तूवर एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या विक्रेत्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यासाठी दोन ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. एमआरपीच्या किंमतीत खाडाखोड करणे किंवा पॅकबंद वस्तूवर किंमत न छापणे यांच्यावरही या कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येतो.